CM ची खुर्ची कळीचा मुद्दा?, 'मविआ' बरोबर महायुतीचाही सावध पवित्रा; वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, अशी प्रचंड इच्छा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या मनात निर्माण झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. परंत, महाविकास आघाडी असो की महायुती यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा पुढे केला जात नाही. दोन्ही आघाड्याकडून सद्या सीएम पदावरून सावध पवित्रा घेतला जात आहे. चला तर जाणून घेऊया, सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये सीएम पदावरुन नेमकं काय आहे सुरू.
दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. गतवेळी 'मी पुन्हा येईन' म्हणत भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले होते. नंतर मुख्यमंत्रीपदावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपशी 25 वर्ष जुनी मैत्री तोडली. पुढे शिवसेनेत फूट पडली. दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, मुख्यमंत्रीपदावर हक्क असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2004 व 2009 मध्ये ते घेतले नाही एकूणच काय तर मुख्यमंत्रीपद हे राज्याच्या राजकारणातील कळीचा मुद्दा राहिला आहे.

परंतु या निवडणुकीपूर्वी सगळ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे हेही या पदाचे सक्षम दावेदार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, हा चेहरा उद्धव ठाकरे यांचा असावा, अशी आग्रही मागणी खासदार संजय राऊत यांनी केली होती; मात्र आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले. हीच स्थिती सत्ताधारी महायुतीमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
लोकसभेतील यशामुळे मविआमध्ये आत्मविश्वास
लोकसभा निवडणुकीतील जोरदार यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना, महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून आघाडीच्या एकजुटीत मिठाचा खडा टाकल्याचे मानले जाते. ठाकरे गटाच्या मागणीमुळे आघाडीत अस्वस्थता पसरली. त्यापाठोपाठ संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. यापूर्वी लोकसभेला सांगली मतदारसंघात उमेदवार देण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली होती. यादरम्यान संजय राऊत यांच्या आक्रमक विधांनामुळे काँग्रेस नेत्यांची मने दुखावली होती. निकालानंतर ठाकरे गटाचा आग्रह किती चुकीचा होता, ते अधोरेखित झाले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केल्यास काँग्रेस कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत. तसेच, महाविकास आघाडीत पाडापाडीचे राजकारण केले जाईल, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटते.
शरद पवार यांच्या पक्षाचाही दावा
तीन दिवसांपूर्वी शदर पवार यांनी सांगितले की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. त्यामुळे ऐनवेळी शरद पवार गटही मुख्यमंत्री पदावर दावा करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
महायुतीत शिंदे की फडणवीस?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात दमदार कामगिरी केली. त्यामुळे महायुकडून ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान, महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे भाजप सहजासहजी या पदावरील दावा सोडणार नाही, हे निश्चित आहे. परिणामी, एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हे तगडे स्पर्धक आहेत. जागा वाढल्यास अजित पवार हेसुद्धा दावा करू शकतात.
महाविकासमध्ये चालले काय?
मुख्यमंत्रिपदावरून भाजप- शिवसेनेची युती तुटली होती. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न केल्यास शिवसैनिकांमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी धास्ती ठाकरे गटाला आहे; मात्र लोकसभेला ठाकरे गट अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपच्या खालोखाल जागा मिळवल्या. अशा परिस्थितीत ठाकरे गटाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीची मागणी करणे कितपत संयुक्तिक होते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही या मागणीला फारसे अनुकूल नव्हते. मुख्यमंत्रिपद हे संख्याबळावर ठरवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कॉंग्रेस, पवारांची ताठर भूमिका, ठाकरेंची मागणी हवेतच विरली
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची मागणी हवेतच विरली. कुठलाही उमेदवार द्या, मी त्याला समर्थन देईन, असे ठाकरे यांना म्हणावे लागले; मात्र त्यांनी घेतलेल्या यू-टर्नमुळे ते भाजप, शिंदेच्या शिवसेनेच्या टीकेचे लक्ष्य ठरले. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय समीकरणे बघता, दबावाचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. यासाठी नुकतीच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली होती. त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नकार देत, निकालानंतर चर्चा करून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवू, असे ठाकरेंना सांगण्यात आले.
कॉंग्रेसमध्ये नाही परंपरा
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही. निकालानंतर मुख्यमंत्री घोषित होतो.












Click it and Unblock the Notifications