Mumbai Weather Update :महाराष्ट्र कोपला, मुंबईत उष्णतेचा कहर, या जिल्ह्यात IMDचा रेड अलर्ट
Mumbai, Maharashtra Weather Update : मागील तीन दिवसांपासून मुंबईतील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे. मुंबईकरांच्या जीवाची लाही लाही होत असल्याने मुंबईकर सध्या चांगलेच अडचणीत आलेले आहेत. आयएमडीने देखील तसा इशारा दिलेला होता. दरम्यान, आता हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट आली आहे. यात विशेषकरून मुंबईकरांसाठी दिलासा देणारा संदेश आहे.
10 तारखेनंतर मुंबईकरांना मिळू शकतो दिलासा
हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या 10 एप्रिलनंतर मुंबईतील तापमानात घट होईल. यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. तर दुसरीकडे 8 एप्रिल पासून कोकणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

उर्वरीत महाराष्ट्रात मात्र होणार लोकांच्या जीवाची लाहीलाही
राज्यातील उर्वरित भागात ढगाळ हवामान राहील. काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयएमडीच्या वतीने एप्रिल ते जून दरम्यान भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या काळात लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोहचले आहे. 45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे.

मुंबई व्यतिरिक्त काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात सूर्य आग ओकू लागलाय
दुसरीकडे, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान हे विदर्भात पाहायला मिळत आहे. कारण, उन्हाळा म्हटला की, विदर्भातील तापमान हे सर्वाधिक असते. अकोल्यात सर्वाधिक 44.2 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी विदर्भातील पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
बुधवारी, 9 एप्रिलला आणि गुरुवारी 10 एप्रिलला विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांना वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.












Click it and Unblock the Notifications