Maharashtra Weather महाराष्ट्रात शिमल्यासारखी थंडी! 7 जिल्ह्यात IMDचा येलो अलर्ट; वाचा अंदाज
Maharashtra Weather Today : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कडाक्याच्या थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी सर्वत्र वातावरण गारेगार होत असून या कडाक्याचा फटका राज्यातील जनतेला बसत आहे. गारठ्याच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाल्याच्या घटनाही राज्यात उघडकीस आल्या असून थंड वारे सध्या महाराष्ट्रावर घोंगावत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात मोठी घट झाली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात तर थंड लाट पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील थंडीची स्थिती (आजचे अपडेट)
राज्यात जळगावसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा खाली आला असून यामुळे हुडहूडी वाढली आहे. जवळपास सर्वच शहरातील तापमान घसरले आहे, आगामी एक महिना थंडीचा असून असा गारठा आणखी काही दिवस राहील असा अंदाज आहे.
येलो अलर्ट जारी, तापमानाची स्थिती
राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान १५°C खाली आले असून, काही ठिकाणी पारा १०°C पर्यंत घसरला आहे. IMD ने खालील सात जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा (Yellow Alert) इशारा दिला आहे: धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर (अहिल्यानगर), पुणे, सोलापूर आणि जळगाव.
जळगावात दोघांचा थंडीमुळे बळी
जळगाव जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या एका आठवड्यात किमान तापमान ७°C पर्यंत घसरले असून, थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मृतांमध्ये रवींद्र प्रसाद (४९) आणि वामन लकडे (७६) यांचा समावेश आहे.
मुंबईचे हवामान (आगामी अंदाज)
मुंबईत शुक्रवारी सकाळपासून थंडी वाढली होती. शनिवारी शहराचे किमान तापमान सुमारे १५°C नोंदवले गेले, जे या हंगामातील सर्वात कमी तापमान होते. आज सोमवार, १५ डिसेंबर रोजी तापमानात किंचित वाढ होऊन ते १८°C पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मुंबईत थंडीची लाट कधीपर्यत?
आज, १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर कायम राहणार असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईत थंडीची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications