महाराष्ट्रात पडद्यामागं काय शिजतंय, राजकारणात नाराजीची ठिणगी?, शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय घडलंय?
Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेदाची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'ड' वर्गाच्या महानगरपालिकांवर सनदी अधिकारी (IAS) नेमण्याच्या निर्णयावरून हा वाद सुरू झाला आहे, ज्यामुळे नगर विकास विभागाचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मनपामधील IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती अन् वादाची ठिणगी
आतापर्यंत 'ड' वर्गाच्या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी नियुक्त केले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापालिकांवरही आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे साडेचार लाखाहून अधिक लोकसंख्या आणि ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्प असलेल्या १९ महापालिकांमध्ये आता सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याआधी 'अ', 'ब', आणि 'क' वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. याव्यतिरिक्त, शिंदे यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केल्यानेही त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटातही अंतर्गत कलह
एकीकडे मुख्यमंत्र्यांशी मतभेद असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) पक्षातही अंतर्गत नाराजीनाट्य सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, शिंदे गटाने केलेल्या विभागप्रमुख नियुक्त्यांमुळे अनेक इच्छुकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
पश्चिम उपनगरांनंतर आता दक्षिण मुंबईतही नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्या विभागप्रमुखपदी झालेल्या नियुक्तीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
या निर्णयाला विरोध म्हणून शिवडी विधानसभा क्षेत्रातील ५ पैकी ४ शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, आपल्यापेक्षा नंतर पक्षात आलेल्यांना महत्त्वाचे पद दिल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
या विरोधात नाना अंबोले यांच्या नियुक्तीच्या विरोधात सह्यांची मोहीम सुरू झाली आहे आणि लवकरच याबाबतचे पत्र थेट एकनाथ शिंदे यांना दिले जाणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुका शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही अंतर्गत नाराजी एकनाथ शिंदे यांच्यासाठी नक्कीच एक मोठे आव्हान आहे.












Click it and Unblock the Notifications