राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 'या' जिल्ह्यात 15 जानेवारीला सुट्टी जाहीर! वाचा यादी
Maharashtra Municipal Elections 2026 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यातील २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आपला मतदानाचा हक्क विनासायास बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने निवडणूक क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

प्रशासकीय अधिसूचना प्रसिद्ध
या संदर्भातील अधिकृत अधिसूचना राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे आणि शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभागांना हे आदेश लागू राहतील. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली आहे.
बाहेरील क्षेत्रातील मतदारांनाही दिलासा
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी #मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक #सुट्टी जाहीर करण्यात आल्याची #अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2026
ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय… pic.twitter.com/LvfuVV8E4G
या निर्णयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही सुट्टी केवळ संबंधित निवडणूक क्षेत्रात राहणाऱ्यांसाठीच नाही, तर त्या मतदारसंघात नाव असलेल्या परंतु कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू असेल. खासगी आस्थापनांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सशुल्क सुट्टी किंवा सवलत देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'या' २९ महानगरपालिकांमध्ये होणार मतदान
शासनाने जाहीर केल्यानुसार खालील महापालिका क्षेत्रांत सुट्टी लागू राहील: बृहन्मुंबई (BMC), ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर (अहमदनगर), जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर.
या निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असून, १५ जानेवारीला होणाऱ्या या महासंग्रामासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications