'मुस्लिमांनी मराठीत अजान करावी', नितेश राणेंचे पुन्हा वादग्रस्त विधान, नव्या वादाला तोंड फुटणार!
BJP Nitesh Rane on Muslims Namaz : महाराष्ट्र सरकारमधील भाजपचे मंत्री आणि नेते नितेश राणे हे कायम वादग्रस्त विधान करण्यात अग्रेसर असतात. तर आज बुधवारी (दि.16 जुलै) पुन्हा त्यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने मुंबईत काही ठिकाणी मराठी पाठशाळा सुरू केल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राणे यांनी मुस्लीम समुदायाला लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले. तर विरोधकांवरही निशाणा साधला.

काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले, "काँग्रेसला मराठी शाळा चालवण्याची गरज का आहे? विरोधकांनी मुस्लिमांना मराठीत अजान देण्यास सांगावे. आमच्या मंदिरांबाहेर 'जय श्री राम'चे नारे लावले जातात, परंतु 'अब्दुल' दुकानांमध्ये बसला आहे. त्यांच्या या विधानाचा रोख स्पष्टपणे मुस्लीम समुदायाकडे होता.
विरोधकांची तीव्र प्रतिक्रिया
- नितेश राणे यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजप नेते धर्म आणि भाषेच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवत आहेत. मुख्यमंत्री यांनी अशा नेत्यांना समज दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
- काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी राणे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना म्हटले की, "मदरशांमध्ये हिंदी आणि इंग्रजी आधीच शिकवले जाते आणि काही संस्थांमध्ये मराठीही शिकवली जाते. अजान अरबीमध्ये दिली जाते, धर्म आणि भाषा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
- महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही, "आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, तर जबरदस्तीने तिसरी भाषा लादण्याच्या विरोधात आहोत. आम्ही लढणार नाही, पण मराठी शिकवू," असे स्पष्ट केले.
या आधीही राणेंनी केले होते वादग्रस्त विधान!
नितेश राणे यांचे असे पहिलेच वादग्रस्त विधान नाही. 11 जुलै रोजी त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, "मी हिंदूंच्या मतांनी आमदार झालो. गोल टोपी आणि दाढी घालणाऱ्या लोकांनी मला मतदान केले नाही. मी हिंदूंना पाठिंबा देणार, परंतु उर्दू बोलणाऱ्यांना पाठिंबा देणार नाही? ते हिरवे साप आहेत. मुंबईचा डीएनए हिंदू आहे."
मनसेवर निशाणा- 'गरीब हिंदूंना लक्ष्य करतात'
नितेश राणे यांनी मनसे पक्षावर निष्क्रियतेचा आरोप करत म्हटले की, मनसे पक्ष निवडकपणे फक्त गरीब हिंदूंना लक्ष्य करतो. राणे म्हणाले, "त्याचे (जावेद शेख यांच्या मुलाचे) नाव राहिल शेख आहे आणि ते (मनसे) त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार नाहीत. ते फक्त गरीब हिंदूंना लक्ष्य करतील कारण त्यांनी जिहादींना खूश करण्यासाठी या हिंदू राष्ट्राचे विभाजन करण्याचा ठेका घेतला आहे.
ते पुढे म्हणाले, "ते हिंदूंवर जे नियम लादतात तेच नियम शेख वर कधी लादतील? सुरुवातीपासूनच हा आमचा प्रश्न आहे. हे स्पष्टपणे राजकारण आहे. ते शेखवर कोणतेही नियम लादत नाहीत.
कोणतीही कारवाई करणार नाहीत. मोहम्मद अली रोड आणि बेहरामपाडा येथे फिरताना त्याचा स्वर मऊ होतो. राणे यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.












Click it and Unblock the Notifications