महाराष्ट्राला पावसाचा तडाखा: लातूर आणि नांदेडमध्ये हाहाकार; 6 गावं पाण्याखाली, लष्कराकडून मदत!
Maharashtra heavy rain 2025 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, याचा सर्वाधिक फटका लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना बसला आहे. ढगफुटीसदृश पावसाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

लातूरमधील भीषण परिस्थिती : ही दोन गावे पुराच्या विळख्यात!
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बोरगाव गावात लेंडी नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. या भीषण परिस्थितीत गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तब्बल ७० शेळ्या, ७ बैल, ५ म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले. हजारो एकर शेती खरडून गेली असून, उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि इतर शेतीसंबंधी साहित्यही वाहून गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
गावातील घरे, गोठे आणि किराणा दुकाने पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातील साडेतीन हजार लोकसंख्येपैकी शेकडो लोकांना घरे सोडून मंदिरात आश्रय घ्यावा लागला. "अशा प्रकारचा पाऊस आम्ही कधीच पाहिला नाही," असे सांगत गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे आणि भाजपा नेते पंडित सूर्यवंशी यांनी नुकसानीचा आढावा घेऊन, शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली आहे.
पावसामुळे उदगीर, अहमदपूर आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. उदगीर-देगलूर, उदगीर-हानेगाव आणि इतर अनेक महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये ढगफुटी आणि लष्कराची मदत
नांदेड जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले आहे. मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर आला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव आणि भासवाडी यांसारख्या गावांमध्ये १०० हून अधिक लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, छत्रपती संभाजीनगरहून सैन्य दलाची तुकडी मदतीसाठी रवाना करण्यात आली आहे.
याचवेळी, इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगा नदीलाही मोठा पूर आला आहे. यामुळे हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहुर या चार तालुक्यांतील नदीकाठच्या शेतीत पाणी साचले आहे.
सोयाबीन, कापूस, मूग आणि तूर यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी पाण्याची आवक सुरू असल्याने पूर ओसरला नाही. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
या दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थिती पाहता, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ सूचना न देता शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करणे गरजेचे आहे.
येलदरी धरण तुडुंब भरले
मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सुरू असलेला पाऊस तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून येत असलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
हे 10 दरवाजे व जलविद्युत केंद्राच्या टर्बाइनमधून एकूण 23800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येलदरी धरण भरल्याने परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पुर्णा या 5 प्रमुख शहरांसह 200 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे. या भागातील जवळपास 70 हजार हेक्टर जमिनीवरील शेतपिकांनाही या पाण्याचा फायदा होईल.
पैनगंगा नदीला पूर
नांदेड जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे हदगाव, हिमायतनगर, किनवट व माहूर या 4 तालुक्यातील नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सध्या नांदेडमध्ये पाऊस थांबला आहे. पण पाण्याची आवक सुरू असल्यामुळे पूर ओसरला नाही. सोयाबीन, कापूस, मूग, तूर ही पीके पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा!
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालीये. दरम्यान, पावसामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झालीये. नांदेडमधील मुखेडमध्ये पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अंत्ययात्रा गुडघाभर पाण्यातून नेण्याची वेळ आलीये. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी,हासना या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुंबई, ठाण्यातही पावसाचा कहर, पुढील 48 तास वैऱ्याचे!
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरू असून, आता पावसाचा जोर अधिकच वाढलेला आहे. पुढील 48 तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी आणि परळ या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः दक्षिण मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचले असून, नागरिकांना त्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
तसेच पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जे.पी. रोड, मिलन सबवे आणि एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, वाहनचालकांसह सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.












Click it and Unblock the Notifications