सावधान! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, १२ जिल्ह्यांमध्ये वीज आणि वादळी वाऱ्यांचा अलर्ट
राज्यात काही दिवसांपासून कमी प्रमाणात पावसाचे प्रमाण दिसून येत असले तरी हवामान विभागाने आता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा नवा अलर्ट दिला आहे. गेल्या आठवड्यांत अनेक भागांत झालेल्या दमदार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहत असून, धरणांमध्येही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज
कोकणातील काही भागांत विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत राहू शकतो. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मात्र वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास असू शकतो. वीजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील हवामानाची स्थिती
मुंबई व उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत आकाश ढगाळ राहील, काही भागांत मध्यम पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा, पेरण्या वेळेत पूर्ण होणार!
राज्यात अनेक भागांत जून महिन्याच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत सरासरी 350 मिमी पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागानुसार 7 आणि 8 जूनला विविध भागांत पुन्हा पावसाची शक्यता आहे. तसेच 13 ते 17 जूनदरम्यानही जोरदार पावसाचा कालावधी येणार आहे. त्यामुळे यंदा जूनअखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications