भाजपचा सलग तिसऱ्यांदा शतकापार झेंडा, काय आहेत यशाची नेमकी कारणे
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024- विधानसभा निवडणुकीचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले आहेत. भाजपने या निवडणुकीत देदीप्यमान यश मिळविल्याचे दिसत आहे. सलग तीन टर्ममध्ये भाजपने शतकाचा आकडा पार केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अनेक स्थित्यंतरे पाहिलेल्या भाजपच्या या यशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. सलग तीन वेळा शंभरी पार करण्याचा रेकाँर्ड महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोणत्यात पक्षाला जमलेला नाही. हाच पराक्रम देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात करुन दाखवला.

सलग तीन टर्ममध्ये शंभरीपार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने ही तिसरी निवडणूक लढवली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही टर्ममध्ये भाजपला स्प्ष्ट बहुमत मिळाले. 2014 मध्ये भाजपला 123 जागा, 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे,आजच्या विजयानंतर भाजपने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे सलग तीन वेळा भाजपाला शंभरीपार नेण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जमलेला नाही. त्यामुळे फडणवीस यांचे हे यश महत्वाचे मानले जात आहे.
पंधरा वर्षात अनेक चढउतार
देवेंद्र फडणवीस 2014 ला राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र पुढच्याच टर्ममध्ये म्हणजे 2019 ला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यानंतर फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारी देत स्वत:तला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रापुढे आणलं. पुन्हा राजकीय समीकरणे जुळवून आणत आणि दोन पक्षात फूट पाडून राज्यात महायुतीचे सरकार आणले. मात्र, पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले होते. त्यानुसार त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एकसंघ बांधण्याचा प्रयत्न केला.
लोकसभेतून घेतला धडा
गेल्या लोकसभेला भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे सच्चे कार्यकर्ते खचले होते. अशा परिस्थितीतही केंद्रीय नेतृत्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा यांचे सर्व अधिकार फडणवीसांना देत, त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. पक्षनेतृत्वाच्या या संधीचे सोनं करुन दाखवत देवेंद्र फडणवीसांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. आजच्या निकालामुळे पुन्हा एकदा भाजपचं राज्यातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून आले.












Click it and Unblock the Notifications