Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Analysis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पानिपत का झाले? जाणून घ्या पक्षाच्या पराभवाची कारणे

Maharashtra Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे खऱ्या अर्थाने जनक. शिवसेना-भाजप युती मधून शिवसेनेला अलगद बाजूला काढण्याचे श्रेय शरद पवार यांना सर्वाधिक जाते. शरद पवार यांच्या प्रयत्नांतूनच महाविकास आघाडी सरकार आकाराला आले.

2019 च्या विधानसभा निवडणुकात गलितगात्र झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी एकहाती उर्जित अवस्थेत आणला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाराष्ट्रात ही लाट एकहाती थोपवून धरली ती देखील शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपेक्षा असलेला नेता आणि पक्ष म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस. पण या निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाचा अक्षरशः धुव्वा उडाला.

Maharashtra Election Result 2024

शरद पवारांच्या पक्षाबाबत जाणकारांचा अंदाज चुकला

शरद पवार यांच्या गटाला साधारणपणे 45 ते 50 जागा मिळतील असा जाणकारांचा अंदाज होता तर अजित पवार यांच्या गटाला बारा ते पंधरा जागा मिळतील असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात उलटेच घडले. अजित पवार यांच्या गटाला 41 जागा मिळाल्या आणि शरद पवार यांचा गट अवघ्या 14 जागांवर स्थिरावला. आता या पराभवाची अनेक कारणे सांगितली जात आहेत.

मोठ्या नेत्यांची कमतरता, दुसऱ्या फळीचा प्रभाव पडला नाही

शरद पवार यांच्या गटाची भिस्त एकट्या शरद पवार यांच्यावर होती. त्यांच्या गटाचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत. तसेच या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघात तगडे उमेदवार देऊन महायुतीने त्यांना मतदारसंघातच जखडून ठेवले होते. त्यामुळे मतदारसंघाबाहेर फारसा प्रभाव टाकण्याची संधी या नेत्यांना मिळाली नाही.

ओबीसींची नाराजी, लाडकी बहिण योजना

मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवार यांची फूस असल्याचा संदेश व्यवस्थितपणे पसरवण्यात आला. त्यामुळे ओबीसी मतदार शरद पवार यांच्यावर बऱ्यापैकी नाराज होता. तसेच उलेमांनी केलेल्या अनाठायी मागण्यांना शरद पवार यांच्या गटाने संमती दिल्याचा संदेश देखील सोशल मीडियावर पसरला. त्याचा फटका देखील शरद पवार यांच्या गटाला बसला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात केलेली विधाने आणि सुप्रिया सुळे यांनी या योजनेची उडवलेली खिल्ली पवार गटाच्या अंगलट आल्याचे सांगितले जात आहे.

धार्मिक मुद्द्यांचा संदर्भ

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला हिंदू श्रद्धास्थानांचा कथित अवमान अधिक कळीचा ठरला. नवी मुंबई येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोरच ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानावर केलेले वक्तव्य अनेकांना आवडलेच असे नाही. त्या भाषणाची क्लिप वायरल झाली आणि त्याचेही नुकसान पवार गटाला सोसावे लागले.

हिंदु मतदारांचा महायुतीकडे कल, पवारांना ही मतं खेचता आली नाही

"एक रहेंगे तो सेफ रहेंगे" हा नारा भाजपने दिला होता आणि तो व्यवस्थित चालवण्यात आला. हिंदू मतदारांचा आणि महिलांचा महायुतीकडे वाढलेला कल रोखण्यात शरद पवार यांना अपयश आले. तसेच, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवले होते, त्यावर मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे करून शरद पवारांनी आपल्या पुतण्याच्या चुकीची पुनरावृत्ती केली, जी लोकांना आवडली नाही.

..अन् पवारांचे डाव यंदा उलटले

शरद पवार हे मोठे नेतृत्व असले तरी स्थानिक पातळीवर बलाढ्य असलेले आमदार अजित पवार यांच्यासोबत होते. त्या त्या मतदारसंघावर स्थानिक आमदारांचा वरचष्मा होता. लोकसभेला दुरंगी असलेली लढत यावेळी तिरंगी झाली होती तर काही ठिकाणी ती चौरंगीही झाली होती. त्याचा अचूक लाभ महायुतीने घेतला आणि शरद पवार यांचे सगळे डाव एका मागोमाग एक उलटे पडत गेले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+