मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कधी सुरु होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सेवा 2028 पर्यंत सुरु होईल, अशी माहिती दिली आहे. 2022 पर्यंतच्या दोन वर्षांच्या काळात या प्रकल्पाला अडचणींचा सामना करावा लागला, परंतु आता काम वेगाने सुरू आहे. 2028 पर्यंत बुलेट ट्रेनची सेवा सुरू होईल,अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठादारांकडून 50 अब्ज डॉलर्स उभारण्याची राज्याची योजना आहे आणि त्यासाठी चार महिन्यांत घोषणा केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

15 अब्ज डॉलरच्या (सुमारे 1.25 लाख कोटी रुपये) लागत असलेला हा प्रकल्प जपानच्या सहकार्याने विकसित होत आहे. हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग असून त्यामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या सात तासांपासून कमी होऊन फक्त तीन तासांपर्यंत येणार आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे, जो जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही ट्रेन 320 किमी प्रति तासाच्या वेगाने धावणार असून 508 किलोमीटरचा प्रवास सुमारे तीन तासांत पूर्ण करणार आहे. या मार्गावर एकूण 12 स्टेशन असणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्टेशनचा समावेश असणार आहे. यापैकी 351 किलोमीटर गुजरातमध्ये आणि 157 किलोमीटर महाराष्ट्रातून जाणार आहे तर 21 किलोमीटरचा एक महत्त्वाचा पाण्याखालील टनल ठाणे खाडीखालील मार्गातून बांधला जाणार आहे, जो भारतातील पहिला असा टनल असणार आहे.
नाशिक ते वाढवन बंदरापर्यंत महामार्ग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्र नाशिक ते वाढवन बंदरापर्यंत एक महामार्ग बांधत आहे, त्यामुळे राज्यातील 17 जिल्हे आधुनिक बंदराशी जोडले जातील. नागपूरला गोव्याशी जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग बांधला जात आहे. मागासलेल्या भागातून जाणारा हा रस्ता प्रकल्प आर्थिक विकासाला चालना देण्यासही मदत करेल."












Click it and Unblock the Notifications