Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उध्दव ठाकरे गटाच्या यादीतही आयात उमेदवारांचा भरणा

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही मराठी भाषिक आणि हिंदुत्व या दोन विषयावर वाढलेली संघटना. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब हे दैवता समान आहेत. राजकीय विचारधारा कोणतीही असली तरी बाळासाहेब ठाकरे बद्दल सर्व पक्षात आदरच दिसून येतो. शिवसेनेच्या जवळपास 58 वर्षांच्या इतिहासात अनेक लोकांनी शिवसेनेत आपली कर्तबगारी दाखवली. तर अनेकांनी शिवसेना सोडून अन्य पक्षात प्रवेश केला.

शिवसेना हा भावनेवर आधारलेला पक्ष आहे. या पक्षाची रचना एखाद्या सैन्यासारखी असून पक्षांतर्गत लोकशाही फक्त कागदपत्रांवर असल्याचे सांगितले जाते. शिवसेना पक्ष सोडणाऱ्याला गद्दार म्हणून हिणवण्याची पद्धत शिवसेनेपासूनच सुरू झाली. आता शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पवारांचे कार्यकर्ते गद्दार म्हणतात. पण "गद्दार" आणि "गद्दारी" या शब्दांचा सर्वाधिक वापर शिवसेनेच्या बंडखोरांसाठी होतो.

Uddhav Thackeray group

भुजबळांना शिवसेनेचा हिसका

1991 साली शिवसेनेचे तत्कालीन आक्रमक नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे नामकरण "लखोबा लोखंडे" असे केले होते. शिवसैनिकांची दहशत इतकी होती की भुजबळ उघडपणे मुंबईच्या माझगाव परिसरात फिरू शकत नव्हते. त्यांच्या बंगल्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. दोन महिने भुजबळ जवळपास अज्ञातवासात होते.

अनेक वर्षे भुजबळांचा उल्लेख शिवसैनिक "गद्दार" म्हणूनच करीत असत. भुजबळानंतर जवळपास बारा ते तेरा वर्षांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. शिवसैनिकांनी राणे यांचा उल्लेखही "गद्दार" म्हणूनच केला. अत्यंत खालच्या शब्दात राणे यांच्यावर टीका करण्यात आली. अर्थात शिवसेनेत अनेक वर्षे घालवलेल्या आणि शिवसेनेची संस्कृती अंगात भिनलेल्या राणे यांनीही या टीकेला त्याच शब्दात प्रत्युत्तर दिले होते.

राणे, राज आणि एकनाथ शिंदे

नारायण राणे यांच्या बंडानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. राज यांच्यावरही शिवसैनिक टीका करीत असले तरी या टिकेची तीव्रता भुजबळ आणि राणे यांच्या इतकी नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जबरदस्त तडाखा दिला तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनात असलेल्या चाळीस आमदारांनी. महाराष्ट्राच्या इतिहासातले ते सर्वात मोठे बंड होते.

एकनाथ शिंदे यांचा उल्लेखही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत असे नेते गद्दार म्हणूनच करतात. जाहीर सभा आणि सभागृहात सुद्धा शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची हेटाळणी केली जाते. परवाच एकनाथ शिंदे रस्त्याने जात असताना एका सामान्य कार्यकर्त्यांने असा उल्लेख केल्यानंतर एकनाथ शिंदे गाडीतून उतरण्याचा प्रसंग महाराष्ट्राने बघितला आहे.

सोडून गेलेले गद्दार आणि दुसर्यांना सोडून आलेले निष्ठावंत

शिवसेना सोडणाऱ्या आणि शिवसेना नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या कोणाचाही उल्लेख शिवसेनेचे नेते "गद्दार" म्हणूनच करत आहेत हे खरे असले, तरी खुद्द शिवसेनेत मात्र दुसऱ्या पक्षात "गद्दारी" करून आलेल्या नेत्यांची संख्याही खूप मोठी आहे. हे नेते उद्धव यांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. आताच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने उमेदवारी दिलेल्या उमेदवारांची नावे पाहिली तर भली मोठी लिस्ट ही दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांची आहे. शिवसेनेतून फुटलेले "गद्दार" असतील तर शिवसेनेत गेलेले अन्य पक्षातील कार्यकर्ते अन्य पक्षांसाठी ही "गद्दार"च आहेत अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांच्या मूळ पक्षाचे नेते व्यक्त करीत आहेत.

मुंबई कोकण आणि शिवसेना हे अत्यंत भावनिक नाते आहे. या भागातून शिवसेनेला सर्वाधिक समर्थन मिळाले. याच पट्ट्यात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारांची आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळ वावरणाऱ्या नेत्यांची नावे अभ्यासण्यासारखी आहेत.

सुषमा अंधारे, प्रियांका चतुर्वेदी आणि सचिन अहिर

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक महिला नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे या वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन पक्षांचा प्रवास करून उद्धव ठाकरे गटात अवघ्या दोन वर्षांपूर्वी दाखल झाल्या. हिंदी आणि इंग्रजी माध्यमात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची गद्दार म्हणून हेटाळणी करणाऱ्या खासदार प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस मधून उद्धव गटात आल्या आणि एका दिवसात खासदार झाल्या. उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक जवळ असणारे वरळीचे नेते सचिन अहिर हे शरद पवारांच्या विरोधात बंड करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दाखल झाले आहेत.

राजन तेली, वैभव नाईक आणि संदेश पारकर

कोकणातून विचार केला असता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्राचा शेवटचा मतदारसंघ असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा तेली यांचा प्रवास राहिलेला आहे. शेजारच्याच कुडाळ मतदार संघातून उमेदवारी मिळालेले वैभव नाईक हे मूळचे काँग्रेस कार्यकर्ते आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंबच काँग्रेसमध्ये कार्यरत होते. बाजूच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात उद्योग आणि उमेदवारी दिलेले संदेश पारकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुन्हा काँग्रेस, भाजप आणि आता शिवसेनेच्या उद्धव गातात दाखल झाले आहेत.

रत्नागिरीतही तीच स्थिती

उद्धव यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिलेले बाळ माने हे भाजपचे माजी आमदार आहेत. तर गुहागर मतदारसंघातून उमेदवारी दिलेले भास्कर जाधव यांनी राणेंच्या आधी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि नंतर मंत्री सुद्धा होते. 2019 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दापोली मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आहेत. महाड मधून उमेदवारी देण्यात आलेल्या स्नेहल जगताप या राष्ट्रवादीच्या परिवारातील सदस्य आहेत.

मुंबईतही मातीच्याच चुली

मुंबईचा विचार केल्यास भायखळा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेले मनोज जामसुतकर हे काँग्रेस मधून उद्धव ठाकरे यांच्या गटात दाखल झाले आहेत. घाटकोपर मधून उमेदवारी मिळालेले संजय भालेराव हे देखील अन्य पक्षाचे सदस्य होते आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले महेश सावंत यांनीही शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या विरोधात बंडखोरी करून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती.

शिवसेनेची भावनिक नाते असणाऱ्या मुंबई आणि कोकणपट्ट्याची ही परिस्थिती आहे. अन्य महाराष्ट्रात देखील याहून वेगळी परिस्थिती नाही. जळगावचे उन्मेष पाटील, मालेगावचे अद्वय हिरे, बार्शीचे दिलीप सोपल, कोल्हापूरचे के पी पाटील, संभाजीनगर मध्य मधून उमेदवारी दिलेले किशनचंद तनवाणी, नाशिक मध्यचे वसंत गीते, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, नेवासाचे शंकरराव गडाख, गेवराईचे बदामराव पंडित, सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे हे देखील अन्य पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या गटात दाखल झाले आहेत.

उद्धव यांची साथ सोडून अन्य पक्षात गेलेले किंवा उद्धव यांना आव्हान देणारे "गद्दार" असतील तर शिवसेनेने उमेदवारी दिलेले हे उमेदवार निष्ठावंत कसे असा प्रश्न, भाजप तसेच एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार करीत आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+