विधानसभा निवडणूकीच्या मुद्यावरुन शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. त्यावेळी बोलतांना त्यांनी संपूर्ण देशाने 'वन नेशन, वन इलेक्शन' हे धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदींनी बोलून 12 तास ही उलटले नाहीत तर काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. हे सरकार देशात चार राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही. त्यांनी म्हटल्या प्रमाणे 4 राज्यात एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान शरद पवार यांनी सरकारला केलं आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर केले. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं नाही.पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केलेल्या देशात वन नेशन, वन इलेक्शन मुद्दा पकडून शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. पवार हे नागपूर दौ-यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

राज्याला शांततेची गरज आहे.राज्यात आणि देशात शांतता प्रस्थापित करायची असेल तर सामाजिक आणि राजकीय स्तरावर संयमाचा पुरस्कार करावा. तसंच राज्यात शांतता कशी प्रस्थापित होईल याची खबरदारी राज्यकर्त्यांनी घ्यावी. किंबहुना बांगलादेशात जे झालं त्याचे पडसाद राज्यात उमटण्याचे कुठलेही कारण नाही. समाजाने एकवाक्यता आणि सामंजस्य राखावं, असे आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई यावर भाष्य करता येईल पण आज शांतता आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणातील अन्य बाबींवर मी बोलू करू इच्छित नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications