MVA : मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर जाहीर भाष्य टाळा, मविआच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर जाहीर भाष्य न करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिन्ही घटक पक्षातील नेते आता मुख्यमंत्री पदावरुन बोलताना सावधानता पाळत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात भरघोस यश मिळाले. त्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांतील यशामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस व ठाकरे गट हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत होते. त्यावर क्रिया - प्रतिक्रिया येऊन आघाडीत वाद होण्याची शक्यता उद्भवत होती. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदावर उगीचच दावे-प्रतिदावे करून वाद न वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी केली होती नाव जाहीर करण्याची मागणी
उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मविआच्या एका मेळाव्यात आपल्या मित्र पक्षांना तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो असे विधान केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा केला होता. ठाकरे गटाच्या प्रमुख दोन नेत्यांनी हे विधान केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा होईल असे सूचक विधान केले होते. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी तर चक्क विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अच्छे दिन येणार असून, मुख्यमंत्रीपद हे नाना पटोले यांनाच मिळेल असा दावा केला होता.
विकास ठाकरे म्हणाले होते सीएम पोस्ट हिसकावून घेऊ
एवढेच नाही तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले नाही तर ते आम्ही हिसकावून घेऊ, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या याविधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. पण आता तिन्ही पक्षातील शीर्ष नेत्यांनी आता सर्वच नेत्यांना मुख्यमंत्रीपदावरून बोलण्यावर सावधानता बाळगण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
पक्षात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते शरद पवार यांनीही काँग्रेसचा मार्ग अवलंबत 'मला इतर कोणाचीही माहिती नाही, आमच्या पक्षात मुख्यमंत्रीपदाचा कोणी दावेदार नाही, असे भाष्य केले होते. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मागणीला शरद पवार यांनी दुजोरा दिला नव्हता. परंतु, त्यानंतर देखील संजय राऊत व नाना पटोले यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन वाकयुद्ध सुरूच होते.












Click it and Unblock the Notifications