Maharashtra Assembly Election : छत्रपती संभाजीनगर 'पूर्व'मध्ये पुन्हा रंगणार BJP विरुद्ध MIM सामना!
Maharashtra Assembly Election : आता विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात याही वेळी भाजप विरुद्ध एमआयएम अशी थेट लढत होऊ शकते, असे सध्या तरी चित्र आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. मागील १० वर्षांपासून भाजपचे अतुल सावे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते याही वेळी मैदानात असणार हे नक्की आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएमकडून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील किंवा कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफार कादरी उमेदवार असू शकतात.
लोकसभेत 'पूर्व' मधून एमआयएमला लीड
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे संदीपान भुमरे 1 लाख 34 हजार 650 मतांनी विजयी झाले. भाजप आमदार अतुल सावेंच्या संभाजीनगर पूर्वतून एमआयएमचे इम्तियाज जलीलांना 25 हजारांची लीड मिळाली. त्यामुळे पूर्वमध्ये एमआयएमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आदर्श बॅंक घोटाळा प्रकरणात इम्तियाज जलील यांनी केलेल्या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी पक्ष तयारी करीत आहे.

एमआयएमचे उमेदवार कोण?
पूर्वमध्ये पक्षाच्या एमआयएमने कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफार कादरी यांना 2014, 2019 मध्ये पक्षाने संधी दिली. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. आता पक्ष तिसऱ्यांदा त्यांना संधी देईल किंवा नाही, याबाबत पक्षातच संभ्रम आहे. दरम्यान, पक्षाने महाराष्ट्रातील पाच उमेदवार जाहीर केले. यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचेसुद्धा नाव आहे. पण, उमेदवारी जाहीर करताना ते कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे इम्तियाज जलील हे 'पूर्व'मधूनच उमेदवार असू शकतात, असा अंदाज आहे.
मत विभाजनावर गणित अवलंबून
हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले तरच एमआयएमला संधी मिळू शकते. फक्त मुस्लिम मतांवर उमेदवार निवडून आणणे शक्य नाही. तसेच मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा महायुतीला होणार हेही निश्चित आहे. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 35 उमेदवार होते. त्यापैकी एमआयएम वगळता मुस्लिम उमेदवार चार होते. या चौघांनी नऊ हजारांच्या जवळपास मतं घेतली. त्याचा फटका एमआयएमचे अब्दुल गफार कादरी यांनी बसला आणि ते पराभूत झाले.
महाविकास आघाडीकडून कोण?
महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोन्हींनी दावा केला आहे. पण, काँग्रेसचे येथे संघटन खिळखिळे झाले आहे. ठाकरे गटाचे राजू वैद्य यांनी तयारी सुरू केली आहे. महविकास आघाडीकडून ते प्रबळ दावेदार आहेत.
जातीय समिकरणे अशी
या मतदारसंघात हिंदूची संख्या मिश्र आहे. मुस्लिम मतदारांची भूमिका कायम निर्णायक राहिली. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
गतवेळी काय झाले होते?
2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे डॉ. अब्दुल गफ्फार कादरी सय्यद यांचा 13 हजार 930 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली.
या आहेत समस्या?
शहरी भागात असलेल्या या मतदारसंघात महापालिकेने विकासकामे केली आहेत. पण, अजूनही पाण्याची समस्या सोडवता आली नाही. 7 ते 8 दिवसांपासून एकदा पाणी पुरवठा होतो. हा या मतदारसंघात प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications