आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ...? वाचा एका क्लिकवर A टू Z माहिती, काय असतात नियम
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक कोणतीही असो, ती जवळ आली की आचारसंहिता हा शब्द सतत कानावर पडतो. निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते. आज मंगळवारी महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी तसेच विरोधकांना आचारसंहितेचं पालन करणे अनिवार्य होणार आहे. आता, ही निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या कालावधीत कोणते नियम असतात हे पाहूयात...
आचारसंहिता म्हणजे काय?
आचारसंहितेला इंग्रजीत 'कोड ऑफ कंडक्ट' असं म्हणतात. व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लावली जाते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं, आणि काय करु नये, याची नियमावली या आचारसंहितेत पाळली जाते. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं. निवडणुका या मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने आचारसंहितेत काही मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली आहेत. याच नियमांचा भंग करणाऱ्यांवर या काळात कायदेशीर कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे. आचारसंहितेची शिस्त पाळणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे.

आचारसंहितेचे फायदे काय?
निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी आचारसंहिता आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारालाही यामुळे प्रतिबंध बसतो.
काय आहेत आचारसंहितेचे नियम?
निवडणुका लढवणारे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं एक आदर्श आचारसंहिता घालून दिली आहे. या आचारसंहितेचं पालन करणे या सर्वांसाठी बंधनकारक असतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलेलं आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर काय कारवाई होते, हेही त्यात सांगण्यात आलं आहे.
कोणते नियम व अटी आहेत...
* मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, आमिष दाखवणे, या सर्व प्रकारांना सक्त मनाई असते.
* या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.
* सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याला किंवा नेत्यांना रस्ते, पाणी, वीज अशी आश्वासने देता येत नाहीत.
* निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.
* मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे
* आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय सभा किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते.
* आचारसंहिता काळात विरोधकांचा निषेध नोंदवणंही नियमबाह्य ठरविण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications