दुपारनंतर समजेल, बंडोबा कोण थंडोबा कोण..? युती-आघाडीची पन्नास जागांवर डोकेदुखी
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. आज सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, दुपारी तीनवाजेपर्यंत बंडोबा-थंडोबाचे चित्र स्पष्ट होईल. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांत पात्र उमेदवारांची संख्या 7066 इतकी आहे. यातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात, हे आज स्पष्ट होईल. दरम्यान राज्यात पन्नासहून अधिक ठिकाणी दोन्हींकडे बंडखोरीची डोकेदुखी वाढली आहे.
ऐन दिवाळीत वरिष्ठांच्या बैठका
विधानसभा निवडणुकीतील बंडोबांना थंड करण्यासाठी ऐन दिवाळीत सर्व पक्षश्रेष्ठींना बैठका घ्याव्या लागल्या. या भेटीगाठींचे फलित आज समजेल. राज्यात प्रथमच सहा मुख्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्याही जास्त होती. पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघांत इच्छुकांनी बंड केले, तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले. देवेंद्र फडणवीस, शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी रमेश चोन्नीथला आदींना ऐन दिवाळीत बंडखोरांशी चर्चा करावी लागली.

अनेक ठिकाणी बंडखोरांची डोकेदुखी
राज्यात बंडखोरांमुळे अनेक मतदारसंघ चर्चेत आले आहेत. सर्वात हाँट आहे मुंबईतील माहिम मतदारसंघ. या मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.मात्र तेथे महायुतीने उमेदवार देऊ नये, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी बंड करत अर्ज भरला.आता हा अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे, सरवणकर, सावंत अशी तिहेरी लढत झाल्यास विजयाचे पारडे कुणाकडे झुकेल हे सांगता येणे अवघड आहे. याशिवाय बोरिवली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्याविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. शेट्टी यांना पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तेथील चित्रही आज स्पष्ट होईल.
तब्बल 50 जागांवर आहे नाराजी
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांच्याविरोधात महायुतीतील शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील अर्ज मागे घेणार नसल्याचे बोलत असून, मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी, नवाब मलिक आणि सुरेश पाटील अशी तिहेरी लढत होऊ शकते. इंदापूर मतदारसंघातही शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात भरत शहा यांनी बंडखोरी करत अर्ज भरला आहे. शरद पवारांनी शहा यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समजूत घातली. मात्र तेही आज अर्ज मागे घेतील का, हे पाहावे लागणार आहे.
ठाकरे गट व शेतकरी पक्षातही तणाव
महाविकास आघाडीतील बंडखोरी शमविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना ठाकरे गट व शेतकरी पक्षातील जागांवरुन तणाव आहे. संजय राऊत यांनी शेकापसोबत चर्चेची तयारी दर्शवली. सांगोला वगळता अलिबाग, पनवेल आणि पेण येथेली जागांबाबत चर्चा करु असा प्रस्तावर राऊतांनी दिला होता. सोलापूर दक्षिणमध्येही तणाव आहे. काँग्रेसच्या दिलीप माने यांना पक्षाने एबी फाँर्म दिला नसल्याने ही जागा ठाकरे गटाचीच आहे, असे संजय राऊत सांगत आहेत. हे सगळे पाहता दुपारी तीन वाजेनंतर सर्व बंडखोरांचे चित्र स्पष्ट होणार आहे.












Click it and Unblock the Notifications