मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणूकीतून माघार, एकही उमेदवार देणार नाही
जालना- काल म्हणजेच रविवारी कोणकोणत्या मतदारसंघात लढणार, हे मनोज जरांगे यांनी सांगितल्यानंतर आज मात्र यू-टर्न घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला. समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत, असे आवाहन आज (सोमवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केले. दरम्यान, काल दिवसभर जरांगे यांनी विधानसभा इच्छुकांची बैठक घेतली होती. मात्र रात्रीतून त्यांनी आपला निर्णय बदलला.

25 मतदारसंघाबाबत झाली होती चर्चा
मराठा, मुस्लिम व दलित समाजाला एकत्र करुन विधानसभा निवडणुकीत लढायचे, असा अजेंडा मनोज जरांगे यांनी गेल्या आठवड्यात मांडला होता. रविवारी रात्री 14 मतदारसंघ ठरवून त्यांनी मराठा समाजाचे उमेदवारही जवळपास ठरवले होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित व मित्रपक्षातील उमेदवार देण्याचा विचार सुरु होता. सोमवारी पहाटेपर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची व एका जातीवरच लढवायची की मुस्लिम व दलितांना सोबत घ्यायचे का, यावर खलबते झाली. परंतु मित्रपक्षाची यादी सकाळी नऊ वाजेपर्यंत न आल्याने जरांगे पाटील यांनी 25 मतदारसंघात लढण्याचा विचार सोडून दिल्याचे समजते.
कुणीही कामाचे नाही- जरांगे पाटील
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघारीचे कारण सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही एका समाजाच्या जोरावर निवडणूक लढता येत नाही. महाविकास आघाडी किंवा महायुती यातील कुणीच आपल्या कामाचे नाही. त्यामुळे कुणाला पाडा व कुणाला निवडून आणा, असं म्हणण्यात अर्थ नाही. तुम्हाला ज्याला मदत करायची त्याला करा. फक्त त्याच्याकडून मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे असे लिहून घ्या व व्हिडीओ काढून घ्या... आता गणिमी काव्याने ताकद दाखवून देऊ, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
माघारीसाठी दिली ही कारणे
जरांगें यांनी निवडणुकीतून माघार का घेतली, याची काही कारणे समोल आली. त्यापैकी मुस्लिम व दलित मित्रपक्षाची यादी आली नाही, हे पहिले कारण असावे. त्यानंतर एकाच समाजाच्या जोरावर निवडणूका जिंकता येत नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कदाचित हे दुसरं कारण असाव. आणि तिसरं व महत्वाचं कारण म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीतील कुणीही आपल्या कामाचं नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कदाचित हे निवडणुकीतून माघार घेण्याचं तिसरं कारण असावं. मी आणि माझे आंदोलन यावरच आपल्याला काम करायचे असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आपण कोणत्याही पक्षाला किंवा अपक्षाला पाठींबा दिलेला नसल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी पुनश्चः केला.












Click it and Unblock the Notifications