कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना पुन्हा गड राखण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीतील 'राडा' नाट्यानंतर अखेर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना मविआने पाठींबा दिला. अगोदर लाटकरांना उमेदवारी, नंतर मधुरिमाराजेंना उमेदवारी, मधुरिमाराजेंचे अर्ज माघारी नाट्य, नंतर राडा, अशा स्थितीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बंडखोर अपक्षाला पाठींबा देण्याची वेळ आली. त्यांच्याविरोधात आता महायुतीकडून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. महायुतीतील एकी व नियोजनबद्ध प्रचार या क्षीरसागरांसाठी सध्या जमेच्या बाजू आहेत. महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीत राजेश क्षीरसागर यांचेच पारडे सध्यातरी जड दिसत आहे.
मविआत उमेदवारीवरुन राडा
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसने अगोदर माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र या घोषणनेनंतर काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली. राड्यानंतर काँग्रेसने एका दिवसात उमेदवारी बदलली. मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. शाहू महारांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतली. या गदारोळात काँग्रेसचे बंडखोर राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन अर्ज कायम ठेवला. अखेर काँग्रेसला राजेश लाटकर यांना पाठींबा द्यावा लागला.

काँग्रेसमधला वाद जगजाहीर
लाटकर व मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीवरुन कोल्हापूरातील वातावरण चांगलेच पेटले. राजू लाटकरांनी शाहू महाराजांची दोन वेळा भेट घेत, उमेदवारीबाबत हट्ट धरला. अखेर शाहू महाराजांनी मधुरिमाराजे यांना उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडले. मात्र या राड्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पारा चांगलाच चढला. अर्ज माघारीच्या दिवशी सतेज पाटलांचा आक्रमक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. लढायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं, मला कशाला तोंडघशी पाडलं असं त्यांनी विचारलं. ज्या लोकांनी आग लावण्याचं काम केलं त्यांना सोडणार नाही, असा दमही सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांना दिला. 'जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला उभं राहिलात, मी पण माझी ताकद दाखवली असती' असं सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या जवळच्या लोकांना उद्देशून म्हटल्यानंतर चांगलीच चर्चा झाली. सतेज पाटील व शाहू महाराजांच्या कार्यकर्त्यांत एकमत नाही, असा संदेश घरोघर पोहोचला.
क्षीरसागर विकासकामांवर लढणार
क्षीरसागर दोन वेळा आमदार होते. 2019 मध्ये ते हरले. मात्र या काळातही त्यांनी लोकांची कामे केली. राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरात, शिवाजी पेठेत कामे केली. रंकाळा तलाव सुशोभिकरण, गांधी मैदानाचे सुशोभिकरण ही कामे क्षीरसागर यांनी मार्गी लावली. शिवाजी पेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील तलाव, मंदिरे, मैदाने यांचे जतन व संवर्धन त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी 25 कोटींचा निधी दिला. या नाट्यगृहाचे काम सध्या सुरु आहे. शहरातील रस्ते 100 टक्के काँक्रीटीकरण करण्याचे कामही भविष्यात होणार आहे. या सर्व विकासकामांमुळे क्षीरसागर यांचे पारडे सध्या जड दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांचा विक्रमी विकासनिधी
कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदुषण रोखण्यासाठी शिंदे यांनी कोट्यवधींचा निधी दिला. कोल्हापूर-सांगलीची महापूरातून सुटका करण्यासाठी 3200 कोटींचा निधी देण्यात आला आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले थिएटरला 25 कोटींचा निधी देण्यात आला आहे. रंकाळा तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल, महालक्ष्मी आंबाबाई मंदीर तिर्थक्षेत्र विकास, ज्योतिबा प्राधिकरण, शेती पाण्याचा प्रश्न या योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. अजूनही ही कामे सुरु आहेत. या विक्रमी निधींमुळे राजेश क्षीरसागर यांचे पारडे जड असल्याचे, दिसत आहे.
पाठींबा दिला पण मविआत कुरबुरी
मविआने पाठींबा दिलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांची उमेदवारी काँग्रेसने अगोदर जाहीर केली होती. मात्र काँग्रेसच्या कार्यालयावरच संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर ही उमेदवारी बदलण्यात आली. अखेर काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली त्या मधुरिमाराजेंनीही ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मविआ तोंडावर पडली. अखेर नाईलाजाने लाटकर यांना पाठींबा द्यावा लागला. म्हणजेच या निवडणुकीत पंजा हे चिन्हच गायब झाले.
दुसरीकडे ठाकरे गट व शरद पवार गटही येथून आग्रही होता. मात्र ही जागा काँग्रेसने भांडून घेतली पण पंजा चिन्ह शेवटपर्यंत मैदानात उतरवू शकले नाही. या सगळ्या गदारोळात मविआचा उमेदवार जिंकेल का, ही शंका आहे. हे सगळं पाहता शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना आपला गड राखण्याची नामी संधी यावेळी आल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications