फडणवीसांनी समजावला वोट जिहादचा अर्थ; महाविकास आघाडीबद्दल सगळंच सांगितलं...
नागपूर- महाविकास आघाडी धर्माचा वापर करुन वोट जिहाद करत आहे. निवडणुकीच्या काळात एवढं लांगूलचालन यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. अल्पसंख्यांक मतासाठी विरोधी पक्ष काम करत असेल तर याविरुद्ध आपल्या सर्वांना एक व्हावंच लागेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
फडणवीसांनी आज पत्रकारांसमोर वोट जिहादचा मुद्दा पुन्हा स्पष्ट केला. ते म्हणाले, उलमा बोर्डाने महाविकास आघाडीपुढे त्यांच्या 17 मागण्या ठेवल्या होत्या. 2012 ते 2014 या दरम्यान दंगलीत गुन्हे दाखल असलेल्या मुस्लिमांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण द्यावे, अशा या 17 मागण्या होत्या. त्या महाविकास आघाडीने मान्य केल्या. त्यानंतर मौलाना सज्जाद नोमांनीनी ट्विट करत वोट जिहादचे सिपेसालार शरद पवार असून उद्धव ठाकरे, राहुल गांधी व नाना पटोले हे सिपाही आहेत, असं सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला.

काल परत सज्जाद नोमानी यांनी दुसरा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात लोकसभेला ज्या मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं. त्या मुस्लिमांना शोधून त्यांच्यावर सोशल बाँयकाँट करा, असा संदेश दिला. नोमानींच्या या दोन्ही व्हिडीओनंतर किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, असंही फडणवीसांनी सांगितलं.
फडणवीस पुढे म्हणाले, स्वतःला सेक्युलर समजणारी महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्दही बोलत नाहीत. एक्स्ट्रिम पोलरायझेशन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करत आहे, ते धोकादायक आहे. त्याला आम्ही निश्चित उत्तर देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक रहा, सेफ रहा हे सांगत आहेत. तसंच आपल्याला वागावं लागेल. काँग्रेस ज्या पद्धतीने जाती-जातीचं विभाजन करुन निवडणुका जिंकण्याचा प्रयोग करत आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे. महाविकास आघाडीकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत, रोडमॅप नाही, त्यामुळे ते अशी जातीची विभागणी करत आहे, असा थेट आरोपही फडणवीसांनी केला.












Click it and Unblock the Notifications