Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 100 जागाही मिळणार नाही; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा

Balasaheb Thorat Special Interview : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील आणि महायुती 100 जागांच्या खाली राहील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 'वन इंडिया मराठी' साठी त्यांनी विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कामकाजावर भाष्य केले. तर लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील 'मविआ'ला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Balasaheb Thorat

..तर मुख्यमंत्रीपद मिळू शकते?

जो दोन्ही सभागृहांचा म्हणजे विधिमंडळाचा नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो, असा प्रघात काँग्रेसमध्ये आहे. सध्या काँग्रेसकडून विधिमंडळाचा नेता मी आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाविकास आघाडीची सरशी झाली आणि काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तर आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळू शकतं, असं बाळासाहेब थोरात यांनी थेटपणे सुचवलं आहे.

आम्ही सामपोचाराने चर्चा करतोय!

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण ? या प्रश्नावरून काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे आता विधानसभेतही चांगलं यश मिळालं तर उद्धव ठाकरेंना मुख्यंत्रिपद द्यायला काय हरकत आहे? असं आम्ही थोरात यांना विचारलं. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी, आम्ही सामपोचाराने चर्चा करतो आहोत, असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या चर्चा सुरू आहेत, असंही ते म्हणाले.

महिला सुरक्षेवरुन सरकारवर ताशेरे!

लोकसभेच्या निवडणुकीत सांगली तसंच मुंबईच्या एका जागेवरून वाद होता. तो शेवटपर्यंत सुटलाच नाही. यावेळी मात्र आम्ही प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आणि ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याची जास्त शक्यता असेल तिथे त्या त्या उमेदवाराला प्राधान्य देऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

पक्षांची तोडफोड करून ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार बनवण्यात आलं त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात रोष आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे महिलांच्या संरक्षणाबदद्ल अत्यंत बेजबाबदारपणे वागायचं हा या सरकारचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप थोरात यांनी केला. मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, कुस्तीगीर महिलांवर झालेला अन्याय आणि नुकतंच घडलेलं बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण पाहिलं की भाजप सरकारला महिलांची पर्वा नाही हेच दिसून येतं. हेही जनतेला अजिबात मान्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात समिती

महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यासाठी तुम्हीही एक योजना आणणार आहात. मग निवडणुकांच्या निमित्ताने तुम्हीही तेच करत नाही का ? या प्रश्नावर, गरिबांसाठी कल्याणकारी योजना आणाव्याच लागतील, असं थोरात यांनी म्हटलं आहे. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक समिती नेमली आहे. ही समिती याचा अभ्यास करून योजनांचा आराखडा ठरवेल, असं ते म्हणाले.

विधानांचा विपर्यास हे भाजपची सवय

काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी, आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना रद्द करू, असं म्हटलं होतं. त्यावरही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही योजना रद्द करू, असं ते म्हणाले नव्हते. तर याऐवजी आम्ही दुसरी योजना आणू असं ते म्हणाले होते. विरोधकांच्या वक्तव्याचा विपर्यास करणं ही भाजपची सवयच होऊन गेली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पटोलेंचा राजीनामा अन् सरकार कोसळलं

महाविकास आघाडी सरकार कसं कोसळलं आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार कसं आलं हेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आमचं सरकार वाचलं असतं, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यांनी राजीनामा दिल्यावर अनेक महिने आम्ही विधानसभा अध्यक्ष नेमू शकलो नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

नगर जिल्ह्याचं राजकारण आणि थोरात विरुद्ध विखे पाटील या संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारण हे व्यक्तिद्वेषाचं नसावं असं त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली. त्यावर, तो त्याचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, असं थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरात आपला वारसा त्यांची मुलगी डॉ. जयश्री थोरात यांच्याकडे देऊ इच्छितात. ही घराणेशाही नाही का ? याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

राहुल गांधी न घाबरता लढले

राहुल गांधींचं राजकारण आणि काँग्रेस पक्षाची धुरा कुणाकडे सोपवावी असंही आम्ही त्यांना विचारलं. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. भारतीय जनता पक्षाने कोट्यवधी रुपये खर्च करून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ते घाबरत नाही, ते लढले आहे, अशा शब्दांत थोरात यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले.

प्रत्येक जण सुखी असावा हीच इच्छा

बाळासाहेब थोरात यांच्या घराण्याला सहकाराची परंपरा आहे.त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांचा हा सहकाराचा वारसा, दुधाचा व्यवसाय, कांदा उत्पादकांचे प्रश्न याबद्दल ते या मुलाखतीत आस्थेने बोलले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणीही त्यांनी सांगतिल्या. सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण कसं करावं ते मी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकलो, असं ते म्हणाले. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक सुखी कसा होईल हे माझं स्वप्न आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी या मुलाखतीत आवर्जून सांगितलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+