मोठी बातमी! राज्यात 11 जणांचा पाण्यात बुडून तर विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू
Maharashtra Accident Update : राज्यात ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून जालना, बुलढाणा, रायगड आणि पुणे जिल्ह्यात या घटना घडल्या तर वीज कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला असून यात ९ वर्षीय तसेच १४ वर्षीय मुलांचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्ह्यात दोन जण बुडाले
राज्यात, बुलढाणा, रायगड जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेत सातजण बुडाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात विश्वगंगा नदीत बुडून दोन महिलांचा मृत्यू झाला, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. एकाच कुटुंबातील हे सर्वजण खामगाव येथील रहिवाशी आहेत.

जालना जिल्ह्यात दोन जण बुडाले
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात काल दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनीवारी सायंकाळी ही घटना घडली.
माथेरान इथल्या शार्लोट तलावात तीन तरुण बुडाले
माथेरान इथल्या शार्लोट तलावात तीन तरुण बुडाले आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून दहा जणांचा समूह माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता. यातील काही शार्लोट लेक तलावात पोहण्यासाठी उतरले. यातील तीन जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (वय १९) आणि फिरोज शेख ( वय १९) अशी बेपत्ता असलेल्या तरुणांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलिस, नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी या तिघांचा शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध लागला नव्हता. माथेरान शहराला पाणीपुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शार्लोट परिसरात पोहण्यास मनाई आहे. मात्र हे मनाई आदेश धुडकावत अनेक पर्यटक पोहोण्यासाठी तलावात उतरत असल्याने अशा घटना घडत आहेत.
शेतात विजेचा फटका, तिघांचा मृत्यू, एक जखमी
चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे शेतात काल रविवारी काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. मृतांत लखन दिलीप पवार (वय १४ वर्षे), दशरथ उदल पवार (वय २४ वर्षे,
समाधान प्रकाश राठोड (वय ९ वर्षे) या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय 35 वर्षे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात चौघे बुडाले, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात पर्यटनस्थळी लोखंडी पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुखः व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करणार आहे असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने नदी पात्रातील पाण्यात मोठी वाढ झाली होती, काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुलावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने पूल कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
दोषींवर कडक कारवाई होणार - उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनेबद्दल दुखः व्यक्त करत अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्यातील जुन्या पुलांचे परिक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. पर्यटनस्थळी विशेषतः सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक जिल्हा प्रशासनाने आपत्कालिन मदतीसाठी यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील दुर्घटनेबद्दल दुखः व्यक्त केले आहे. या घटनेमागील कारणांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.












Click it and Unblock the Notifications