धनंजय मुंडे यांनी किती सोसावं..? महंत नामदेव शास्त्री यांचा सवाल; मुंडे आत्मशांतीसाठी भगवानगडावर
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड प्रसारमाध्यमांच्या हिटलिस्टवर आला. त्यानंतर विरोधकांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांचा राजीनामा मागितला गेला. मात्र सरकार व अजित पवार मुंडे यांच्या पाठीशी कायम राहिले. याच कारणाने बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्या हातून गेले. हे सगळे वार एकामागून एक झाल्यानंतर काल, धनंजय मुंडे आत्मशांतीसाठी थेट भगवानगडावर गेले. तेथे त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याशी हितगुज केले.

नेमके काय झाले?
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या सर्व बाजूंनी आरोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पाठीशी घातल असल्याचा आरोपही होत आहे. सर्व बाजूंनी कोलाहल माजले असताना मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडाला शरण गेले. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहचले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यांच्याशी सगळ्या बाबीवर हितगूज केले. त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आता भगवानगड कुणाच्या पाठीशी उभा आहे, याबाबत चर्चा सुरु होती.
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर मुक्काम केल्यावर कुणाच्या पाठीशी आहे, हा प्रश्न विचारला जात आहे. मोठ्या संकटातून जाणाऱ्या धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर नेमके काय केले, हा प्रश्नही विचारला जात आहे. या सगळ्या प्रकारानंतर आज भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल माहिती दिली. भगवानगड मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे त्यांनी सांगितले. आध्यात्मिक चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान गडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर, सामजिक ध्रुवीकरण, समाजातील तेढ यावर भाष्य केले. त्यांनी धनंजय मुंडे यांना सर्वच प्रकरणात क्लीनचिट दिली. इतकेच नाही तर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा थेट संदेश दिला.
काय म्हणाले महंत शास्त्री?
प्रसारमाध्यमांशी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले, "धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही. तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली, याची मीडिया दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. मुंडे गुन्हेगार नाही, याची जाणीव त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही आहे. धनंजय मुंडे यांनी किती सोसावं?" असे नामदेव महाराज शास्त्री म्हणाले.
जातीवाद राजकारण्यांनी आणला
ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांनी जातीयता नष्ट करण्याचे काम केले. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जातीय सलोखा टिकून राहिला. पण राजकारण्यांनी राज्यात जातीयवाद आणला. त्याची झळ आता वारकरी संप्रदायाला सुद्धा बसली आहे. जातीय सलोखा टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे काम आहे, असे नामदेव महाराज शास्त्री म्हणाले. भगवान गड हा कायम धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहिल, याचा पुनरुच्चार नामदेव शास्त्री यांनी केला.












Click it and Unblock the Notifications