महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी का सापडत नाही? रोहीत पवारांनी सांगितला 'हा' धागा! जाणून घ्या मर्डर केस
Mahadev Munde Murder Case : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाला जवळपास २० महिने उलटले तरीही आरोपी सापडले नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यात मोर्चेही निघाले,त्यांच्या पत्नीने निदर्शनेही केली. त्यानंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर आता हे प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात अद्यापही महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतिक्षा आहे.

रोहीत पवार यांनी परळीत काल महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. महादव मुंडेंच्या खुनानंतर आपबिती त्यांनी कुटुंबाकडून ऐकली. महादेव मुंडे यांचे मारेकरी का सापडत नाही? याचे उत्तर रोहीत पवारांनी दिले आहे.
एखाद्या चित्रपटात ज्याप्रकारे गुंडाच्या दहशतीला घाबरून कुणीही तक्रार देण्यास, साक्ष देण्यास धजावत नाही, सर्व यंत्रणा गुंडांच्या दावणीला बांधलेल्या असतात, अशाच प्रकारची वास्तवातली #आप_बीती परळीमध्ये काल महादेव मुंडे कुटुंबियांकडून ऐकली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 30, 2025
२० महिने होऊनही अद्याप एकही आरोपी कसा सापडत… pic.twitter.com/cydfvggbxm
काय म्हणाले रोहीत पवार..?
रोहीत पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली. यात ते म्हणाले, "एखाद्या चित्रपटात ज्याप्रकारे गुंडाच्या दहशतीला घाबरून कुणीही तक्रार देण्यास, साक्ष देण्यास धजावत नाही, सर्व यंत्रणा गुंडांच्या दावणीला बांधलेल्या असतात, अशाच प्रकारची वास्तवातली आपबीती परळीमध्ये काल महादेव मुंडे कुटुंबियांकडून ऐकली. २० महिने होऊनही अद्याप एकही आरोपी कसा सापडत नाही? याचं उत्तर तपास यंत्रणेत आहे." असंही त्यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घ्यावी..
रोहीत पवारांनी म्हटलं की, "एखाद्या अधिकाऱ्याने योग्य दिशेने तपास सुरु करताच त्याची बदली केली जाते. PSI संतोष साबळे यांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला असून त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे साबळे यांचा SIT मध्ये समावेश करावा तसेच या प्रकरणाची चौकशी IPS पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात करावी अशी मुंडे कुटुंबियांची मागणी आहे. मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांना याबाबत मी मिडीयाच्या माध्यमातून विनंती करतो की, मुंडे कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांना न्याय द्यावा. या भागात चांगले अधिकारी आले तर मुंडे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल आणि गुंडाची दहशत देखील मोडून निघेल."
सूर्यवंशी, मुंडे, देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र
रोहीत पवार म्हणाले, "गुंडाची दहशत, गुंडांना राजकीय आश्रय, यंत्रणांची साथ नाही अशा स्थितीत ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी तर वैभवी देशमुख आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी लढत असलेला लढा कोणत्याही मोठ्या लढ्यापेक्षा कमी नाही. न्याय मिळावा यासाठी बीडचं मुंडे कुटुंब, देशमुख कुटुंब आणि परभणीचं सूर्यवंशी कुटुंब लढत असलेल्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे."
काय आहे महादेव मुंडे खून प्रकरण?
२० ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून झाला होता. हा गुन्हा घडून जवळपास २० महिने उलटले, तरीदेखील गुन्हेगार अद्याप हाती लागलेले नाहीत. एवढे महिने झाले तरीही आरोपींचा ठावठिकाणा का आणि कसा लागला नाही, आरोपीला अभय दिले जात असून हे प्रकरण मागील वीस महिन्यांपासून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. या खुनानंतर अनेकदा पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषणं, निदर्शन केली असून त्याची चर्चाही झाली आहे.
शवविच्छेदन अहवालासंबंधीत काय आहे दावा
महादेव मुंडे प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बाळ बांगर यांनी शवविच्छेदन अहवाल समोर आणल्याचे एबीपी माझाने वृत्त दिले होते, त्यानुसार, हत्या अत्यंत क्रूरपणे केली गेली. गळा दाबून त्यांचा खून झाला असून त्यांच्या तोंड, मान आणि हातावरती सोळा वार होते. २१ ऑक्टोबर २०२३ ला महादेव मुंडे यांचा खून झाला. २२ ऑक्टोबरला सव्वा तास उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली होती.












Click it and Unblock the Notifications