पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांनी गाजवला; सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी
Mumbai: राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन महत्वाचे आहे. त्यात विरोधकांनी सरकार पक्षाची पूरती कोंडी करण्याचे ठरवले आहे. येत्या तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर प्रचंड गोंधळ घातला. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी प्रश्नावर सरकारला सवाल
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर प्रचंड गोंधळ घातला. टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा दिल्या. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून गेला.
विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर गोंधळ घालून अधिवेशनात सरकारला कसं आणि किती धारेवर धरलं जाईल याचे संकेतच दिले आहेत. त्यामुळे इथून पुढे सभागृहात चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
शेतीची वीजबिले, कर्ज माफ करण्याची मागणी
शेतकऱ्यांची वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी झालीच पाहिजे असे मुद्दे विरोधक अंबादास दानवे, आणि मविआच्या नेत्यांनी लाऊन धरले. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, या मुद्द्यांवर कृषिमंत्री धनंजय मुंडे देखील टीकेचे धनी ठरले आहेत.
राज्यातील दुष्काळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार दिलास कधी देणार? असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला.मविआच्या आमदारांनी आंदोलन करत ' शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो' म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी अनिल देशमुख आणि भाई जगतापही उपस्थित होते.
विशेष म्हणजे विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे यांची एन्ट्री होताच आमदारांनी पेढे वाटप केल्याचं चित्रही विचार करायला लावणारं होते. त्यामुळे आगामी काळात हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. कांदा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, उद्योगाचं स्थलांतर आदी मुद्दे चर्चेचे विषय ठरतील.
विधानसभेच्या दृष्टीने अधिवेशन महत्वाचं
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. त्या तुलनेने महायुतीने 48 पैकी 30 जागा जिंकत मोठं यश मिळवलं. मविआने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परिणामी सरकारची, योजनांची पोलखोल करत राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न महविकास आघाडीचे नेते करताना दिसणार आहेत.












Click it and Unblock the Notifications