लक्ष्मण हाके बारामतीत आक्रमक, ‘शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्रावर बसवलं'
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादामुळे नाराज झालेल्या ओबीसी समाजाने आता रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच बारामतीमध्ये, जोरदार मोर्चा काढून त्यांना थेट आव्हान दिले आहे.

पवार कुटुंबावर थेट हल्ला
बारामतीतील भाषणात लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर तुफान टीका केली. "शरद पवार यांनीच मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. शरद पवार आमची (ओबीसींची) मते घेतात, पण पाठिंबा मात्र जरांगे यांना देतात, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी हाके यांनी मंडल आयोगाच्या इतिहासावरही भाष्य केले. "जर कोणी म्हटले की मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला, तर त्याचे कानफाड फोडा," असे आक्रमक विधान त्यांनी केले. देशभरात मंडल आयोग लागू झाला, पण महाराष्ट्रात त्याला विलंब झाला. हाके यांनी दि. बा. पाटील, बबनरावजी ढाकणे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे आणि बाळासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून दिले.
राजकीय वारसा आणि संस्थांवर ताबा
लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर राजकीय वारसा बाहेर जाऊ न देण्याचा आरोप केला. "कुटुंबाच्या बाहेर कारखाने जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदारकी, खासदारकी न जाऊ देणारे," अशा शब्दांत त्यांनी पवार कुटुंबाच्या राजकारणावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, शरद पवार एकट्या व्यक्तीकडे 400 हून अधिक संस्थांचे अध्यक्षपद आहे.
यामध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्था आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला. "रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल असा नियम होता, पण त्यात खाडाखोड करून शरद पवार अध्यक्ष झाले," असा आरोप त्यांनी केला.
ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी
अजित पवार यांच्या 'कॅनलच्या कंम्पाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा' या जुन्या विधानाचा संदर्भ देत हाके यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. "कंपाउंड तुझ्या बापाचं आहे का?" असा सवाल करत त्यांनी सामान्यांच्या पैशातून होणाऱ्या सत्तेच्या राजकारणावर बोट ठेवले. ते म्हणाले, "सत्तेतून पैसा, आणि पैशातून पुन्हा कारखाने" असेच राजकारण चालले आहे.
या भाषणात त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल एक मोठा इशारा दिला. "जर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले, तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी अशी लढत होणार आहे. पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होती, पण आता पुढच्या निवडणुकीत लढत डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी असेल," असे ते म्हणाले. हाके यांचे हे वक्तव्य मराठा समाजातील काही व्यक्तींना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना सूचित करत आहे, ज्यामुळे आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या भाषणादरम्यान त्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकरांनी फोनवरूनच जनतेशी संवाद साधला आणि "जबरदस्तीने दिलेल्या आरक्षणाविरुद्ध आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल," असे आवाहन केले.












Click it and Unblock the Notifications