मोठी बातमी: 'लाडकी बहीण' योजनेत घोटाळा उघड; 14 हजार 'दाजीं'कडून वसूली अन्यथा गुन्हा..
Ladki Bahin Yojana Latest news : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ तब्बल दोन कोटी महिलांनी घेतला. मात्र, आता या योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
निवडणुकीच्या काळात घाईघाईने झालेल्या पडताळणी प्रक्रियेचा गैरफायदा घेत, १४ हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली असून, आता या बोगस 'दाजीं'वर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

..तर गुन्हा दाखल होणार
या गैरप्रकारामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. विरोधकांनी 'ही योजना केवळ मतांसाठी सुरू केली होती' असा आरोप करत पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सरकारच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे ४६ हजार कोटी रुपयांचा भार येत असल्याने, आता सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, ज्या पुरुषांनी खोट्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून गेल्या ११ महिन्यांत मिळालेले पैसे परत घेतले जाणार आहेत.
प्रत्येक बोगस लाभार्थीकडून १६,५०० रुपये (११ महिन्यांचे) वसूल केले जातील. एवढेच नाही तर, शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
२६ लाख खात्यांची पडताळणी सुरू
हा गोंधळ दूर करण्यासाठी आता महिला व बालकल्याण विभाग आणि केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मदतीने २६ लाख बँक खात्यांची पडताळणी सुरू झाली आहे. या पडताळणीतून दोन प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत:
योग्य प्रकरणे
काही महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्यामुळे त्यांनी कुटुंबातील पुरुषांचे बँक खाते जोडले होते. अशा महिलांचा लाभ पुढेही सुरू ठेवण्यात येईल.
बोगस प्रकरणे
ज्या पुरुषांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications