कृषीमंत्री होताच दत्तात्रय भरणे काय बोलून गेले? नवीन वादाला फुटलं तोंड
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान रमी खेळल्याच्या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आले आणि त्याजागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना हे महत्त्वाचे खाते सोपवण्यात आले. मात्र, मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी एका वादग्रस्त विधानाने नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणाले कृषीमंत्री भरणे?
महसूल संदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक विधान केले, ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. "कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात. पण वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसं नोंद ठेवतात," असे वक्तव्य त्यांनी केले.
या विधानामुळे, 'वाकडं काम नियमात कसं बसवता येतं?' असा सवाल करत विरोधकांनी त्यांना घेरले आहे. कृषी खात्याला नवीन चेहरा मिळाल्यानंतरही या खात्यात आता 'वाकडी कामे' होणार की काय, अशी खोचक टीकाही काही जणांकडून केली जात आहे.
रोहित पवारांचा दत्तात्रय भरणेंना इशारा
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र गट) आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हे तुमचं पहिलं वक्तव्य आहे आणि ते इतकं घातक आहे. तुम्ही म्हणालात की वाकडी कामं सुद्धा करावी लागतात. अनेक नेत्यांनी वेडवाकडी कामं करून राज्याची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. मी भरणे मामांना सांगतो की, तुम्हाला वाकडं काम करण्यासाठी हे पद दिलेलं नाही. तुम्ही सरळ काम करत असाल, तर आम्ही त्याचं स्वागत करू."
रोहित पवारांनी पुढे खणखणीत शब्दांत इशारा दिला, "संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे लक्ष ठेवून आहे. तुम्ही वाकड्या कामाबद्दल बोललात, पण जर तुमच्याकडून वाकडं काम झालं, तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही." या इशाऱ्यानंतर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications