शाहू महाराज छत्रपती खासदारकीचा राजीनामा देणार? कोल्हापुरात काय घडलं, सतेज पाटील म्हणाले- फसवणूक झाली
Kolhapur News Update : सध्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. कॉंग्रेसनं आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अंतर्गत विरोधामुळे त्यांना डावलून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. अशातच काल मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतली. अशा अनेक नाट्यमय घडामोड या मतदारसंघात घडल्या. मात्र, मधुरिमाराजे यांची माघार काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायल मिळतेय. त्यामुळे या निर्णयावर त्यांनी संताप व्यक्त केलाय. हे सगळं कसं घडलं, त्यावर काय प्रतिक्रिया आल्या, हे सविस्तर जाणून घेऊ.
सतेज पाटील म्हणाले फसवणूक झाली
शाहू महाराजांनी आणि मधुरिमाराजे यांनी आपली फसवणूक केल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटलांचा संताप मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. संतप्त पाटील यांनी अर्ज माघारीनंतर मधुरिमाराजे आणि शाहू छत्रपतींना उद्देशून केलेली वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

भाजपच्या हाती आयते कोलीत
यावरून आता भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी शाहू महाराजांचा आणि कोल्हापुरातील राजघराण्याचा अवमान सतेज पाटलांनी केल्याचं म्हटलंत. माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, "शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मला सोशल मीडियाद्वारे समजली. त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही.
कारण ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा अवमान झाला तो कोणीही सहन करू शकणार नाही. आजपर्यंत कोणीही कोल्हापूरच्या राजघरण्याविषयी अशी वक्तव्यं करण्याचं धाडस केलं नव्हतं. पण सतेज पाटील स्वत:ला सर्वोच्च समजतात. त्यामुळे त्यांनी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अर्वाच्य भाषेत वक्तव्य केली आहेत. त्यामुळे महाराजांचं मन दुखावलं असेल हे सर्व वेदनादायी असून कोल्हापूरची जनता हे अजिबात सहन करणार नाही.
भाजप एकतर्फी विजयी होईल?
ज्या महाराजांसाठी 6 महिन्यांपूर्वी गादीचा मान, गादीचा मान सांगत मतं मागत होते. आज त्याच महाराजांना ते बोलत होते. सतेज पाटील एवढे मोठे झाले का? की ते राजघराण्यावर बोलायला लागले, असा सवाल महाडिकांनी केला. शिवाय जे कोल्हापूर उत्तरमध्ये घडलं त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाचही जागांवर दिसून येईल. या सर्व जागांवर काँग्रेसचा सुपडा साफ होऊन भाजप एकतर्फी विजयी होईल असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications