शरद पवार यांच्यावरील टीकेने जितेंद्र आव्हाड आक्रमक
मुंबई : रविवारी बारामती येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भुजबळ यांच्या टीकेचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आव्हाड म्हणतात, "भुजबळसाहेब तुम्ही आदरणीय पवार साहेबांबाबत केलेले वक्तव्य आम्ही सर्वांनीच ऐकले. गेली दोन वर्षे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच बाजूंना केवळ खेळवत आहे." आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठका घ्यायच्या मात्र अंतिम तोडगा काहीच काढायचा नाही, चर्चांमधे सर्वांना गुंतवून ठेवून या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवायचे, हिच या सरकारची रणनीती आहे. परवाची आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक हा देखील सरकारचा त्यापैकीच एक प्रकार होता, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
सरकारने आरक्षणाच्या विषयावर उचललेल्या कोणत्याही पावलांना विरोधीपक्षाने कायमच साथ दिली आहे. यापूर्वी सरकारने दोन्ही बाजूंशी चर्चा करताना विरोधी पक्षांना कधीही विश्वासात घेतले नाही. जे आम्हाला अपेक्षित होते. त्यामुळेच आम्हाला असे वाटले की, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पण, तुम्हाला विरोधी पक्षांची काही गरजच वाटत नाही, असा दावा देखील आव्हाड यांनी केला आहे.
सरकारने विरोधकांना मोजलेच नाही
खरंतर परंपरेनुसार विरोधी पक्ष आणि सरकार यांनी एकत्र बसून या घडामोडींमध्ये सहभागी व्हायला हवे होते. पण, सरकारने गेल्या दोन वर्षात विरोधी पक्षाला मोजलेच नाही. किंबहुना विरोधी पक्षांची ताकदच नाही असे आपल्याला व आपल्या सरकारला वाटत होते.
भुजबळसाहेब आपणही बाहेर जेवढे विरोधात बोलता; तेवढेच कॅबिनेटमध्ये बोलले असते अन् कॅबिनेट ला निर्णय घ्यायला लावला असता ती आपल्यात क्षमता आहे किंवा मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर लोकांच्या प्रश्नावर लढणारा नेता म्हणून म्हणून आपली ख्याती आहे ती अजुन वृंधिंगत झाली असती. फक्त दोन समाजात तेढ निर्माण होईल, याची हे सरकार व्यवस्था करीत असते. लोकसभेला बसलेल्या फटक्या मुळे आपले सरकार अस्वस्थ आहे आणि उभ्या महाराष्ट्रला ते दिसते आहे, अशी टीका देखील आव्हाड यांनी केलीय.
काय म्हणाले होते भुजबळ ?
आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत. असा आरोप छगन भुजबळ यांनी बारामती येथे बोलताना केला होता.












Click it and Unblock the Notifications