जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात कुठून सुरू झाला वाद, काय आहे इतिहास?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद चर्चेत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान या वादाने उग्र रूप धारण केले असून, दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधानभवनाच्या आवारातच हाणामारी झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा वाद नेमका कधी आणि कसा सुरू झाला, याचा सविस्तर आढावा घेऊया.

वादाची ठिणगी
या वादाची सुरुवात गोपीचंद पडळकर यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने झाली. काही दिवसांपूर्वी पडळकरांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, "धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत. पादरीला ठोकणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस आणि पादरीचा सैराट करेल त्याला ११ लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे." हे प्रक्षोभक वक्तव्य पडळकरांनी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला.
आव्हाडांची तक्रार आणि पडळकरांचा प्रतिहल्ला
पडळकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या अधिवेशनात थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. त्यांनी पडळकरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांच्यावर 'अर्बन नक्षल' असा आरोप करत शाब्दिक हल्ला चढवला, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला.
'मंगळसूत्र चोर' आणि त्यानंतरचा राडा
या शाब्दिक युद्धात भर घालत, अधिवेशनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून 'मंगळसूत्र चोर' अशी घोषणाबाजी केली. या घटनेनंतर बुधवारी (१६ जुलै रोजी) विधानभवनाच्या गेटवरच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या एका समर्थकाला (धनंजय देशमुख) लागल्याचा आरोप करण्यात आला. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळही झाली.
विधानभवनात राडा आणि जीवे मारण्याच्या धमक्या
गुरुवारी (१७ जुलै रोजी) हा वाद विकोपाला गेला. जितेंद्र आव्हाड सभागृहात भाषण करून बाहेर आल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आव्हाडांच्या समर्थकांनी आरोप केला की, पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेपूर्वीच आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, गोपीचंद पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्यांकडून धमकीचे मेसेज आल्याचा दावा केला होता. "गोपी साहेबाच्या नादाला लागला तर तू मेला", "तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती, पण साहेबांनी घातली नाही," अशा धमक्या आणि अश्लील शिवीगाळ असलेले मेसेज आल्याचे आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.
आव्हाडांचा संताप आणि पडळकरांची दिलगिरी
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. "मला मारण्याचा हा डाव होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर आम्ही कशाला आमदार राहायचं? विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करणार असतील, तर आम्ही सुरक्षित नाहीत," असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. दुसरीकडे, गोपीचंद पडळकर यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून, या घटनेबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
हा वाद पाहता, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत आणि आगामी काळात यावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications