राष्ट्रवादी-मनसेत जुंपली; आव्हाडांनी साधला थेट राज ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...
Jitendra Awhad criticism of Raj Thackeray : शरद पवार हे केवळ एका तालुक्याचे नेते आहेत. त्यांनी फक्त एका तालुक्यातच उद्योग उभारलेत, अशी टिका मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती. आता याच टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंना त्यांच्या खालच्या माळ्यावर कोण राहतो, हे तरी माहित आहे का..? असा प्रतिप्रश्न आव्हाडांनी केलाय.
नेमकं काय होतं प्रकरण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. पवारांचं राजकारण हे जातीयवादी असून त्यांनीच जातीय राजकारणाची सुरुवात केलीय, असा आरोप राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. शरद पवारांच्या बारामतीमधील उद्योगधंद्यांवरुन व विकासावरूनही राज ठाकरेंनी त्यांना हिनवलं. शरद पवार हे केवळ तालुक्याचे नेते, कारण एका तालुक्यातच त्यांनी उद्योग व इंडस्ट्रीज उभारली. जो आपल्या तालुक्यात व्यवसाय, उद्योग आणतो तो तालुक्याचा नेता असतो, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टिका केली होती.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राज ठाकरे यांच्या टिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनीही पलटवार केला. राज ठाकरे यांच्या खालच्या माळ्यावर कोण राहतो ते तर त्यांना माहिती आहे का? अशी खोचक प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला. शरद पवारांनी कधीही कोणता पक्ष फोडला नाही. त्यामुळे त्यांच्यावर हा आरोप लागू शकत नाहीत, असंही आव्हाडांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष
जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार सभा होणार आहे. त्याआधीच जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप महायुतीतील पक्षांवर केला. प्रत्येक सोसायटीचा रेट ठरवला जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. अशा प्रकारचे राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं.












Click it and Unblock the Notifications