झारखंडमध्ये भाजप लढेल 69 जागा; कसा असेल जागावाटपाचा फाँर्म्यूला..?
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा केली. एकूण 81 जागांसाठी पहिला टप्पात 13 नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमधील घडामोडी वाढल्या आहेत. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेससह मित्र पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. तर भाजप विरोधी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जागा वाटपावर चर्चा करण्यात येत आहेत. झारखंडमधील एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आहे.
{image-bjpjharkhandassemblyelection-1729169402.jpg marathi.oneindia.com
भाजप 69 जागा लढवणार
भाजपचा मित्र पक्षांसह झारखंडची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्नात आहे. या राज्यात त्यांच्यासोबत जदयू, लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि आजसू हे पक्ष आहेत. या पक्षांसोबत भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 69 जागांवर निवडणूक लढवेल. जदयूला 2 जागा, आजसूला 9 जागा मिळतील. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीला एक जागा मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. जागा वाटपाबाबात एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे.
एनडीएच्या पहिल्या यादीची प्रतिक्षा
निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक जाहीर केली. भाजपची केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठका देखील झाल्या. विधानसभा निवडणुकीला कुणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. भाजप येत्या काही दिवसांमध्ये पहिली यादी जाहीर करेल. त्यानंतर एनडीएतील मित्रपक्ष त्यांचे उमेदवार जाहीर करतील. लवकरच जागावाटपाची चर्चा पूर्ण होऊन भाजपचे सहयोगी पक्ष आपले उमेदवार जाहिर करणार आहेत. येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्यावेळी थोडक्यातून हुकली होती सत्ता
गेल्यावेळी म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापन करता आली नव्हती. भाजपला फक्त 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी झारखंड मुक्ती मोर्चानं 30, तर काँग्रेसनं 16 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. यावेळी हेमंत सोरेन यांच्यासमोर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचं आव्हान असेल. तर, दुसरीकडे भाजप देखील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्या काळात चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. तर, हेमंत सोरेन जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनले. चंपई सोरेन यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.












Click it and Unblock the Notifications