मोठी बातमी ! जयंत पाटलांनी राजीनामा दिलाच नाही, 'या' नेत्याचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वतःला या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी पाटील यांनी अत्यंत भावनिक आवाहन करत म्हटले होते की, "पवार साहेबांनी मला अनेक संधी दिल्या, सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो."
त्यानंतर, जयंत पाटलांनी शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे आणि १५ जुलै रोजी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल, असे वृत्त आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे राजीनाम्याचे वृत्त "निव्वळ खोडसाळपणाचे" असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढला आहे.

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे यांची या पदावर निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, "प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अजून कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. पवार साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. १५ तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावे चर्चेत आहेत आणि माझे नावही त्यात आहे. जेव्हा निर्णय होईल, निवड होईल, तेव्हा निश्चितपणे काम करू." असे असले तरी, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
पक्षात कोणतीही नाराजी नाही
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, जितेंद्र आव्हाड यांनी हे वृत्त साफ फेटाळून लावले. "तुम्हाला जी माहिती मिळाली आहे ती मला मिळालेली नाही. पक्षाची एक विशिष्ट पद्धत असते. पक्षाची बैठक घेऊन त्यात निर्णय घेतला जातो," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "पक्षात कोणतीही नाराजी नाही. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, हे मला तुमच्याकडूनच कळत आहे," असेही ते म्हणाले. पवार साहेब नेहमीच सर्वांना विश्वासात घेऊन आणि बैठक घेऊन असे महत्त्वाचे निर्णय घेतात, असेही आव्हाडांनी नमूद केले.
राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचेच
"मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत असतो," असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाबाबतचा गुंता अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला रोहित पवार यांनी मात्र राजीनाम्याचे वृत्त स्वीकारत, १५ जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल आणि ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील, असे म्हटले आहे.
या सर्व घडामोडींवरून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजूनही स्पष्टता नाही, असे दिसते. १५ जुलैला नेमके काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications