अजितदादांचे 'ते' अपूर्ण स्वप्न अन् राष्ट्रवादीची एकी; जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा
Jayant Patil on NCP Merger Plan Ajit Pawar Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेने उधाण आले आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक असा गौप्यस्फोट केला आहे, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
"अजितदादांना शरद पवारांच्या हयातीतच दोन्ही पक्ष एकत्र करायचे होते," असा दावा जयंत पाटील यांनी केला असून त्याचे सविस्तर तपशील देखील समोर आले आहेत.

१२ फेब्रुवारीची तारीख अन् विलीनीकरणाचा प्लॅन
जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू होत्या. यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख विलीनीकरणाच्या घोषणेसाठी निश्चित करण्यात आली होती. पवारांच्या उपस्थितीतच कुटुंब आणि पक्ष पुन्हा एक व्हावा, अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी या संदर्भात ८ ते १० वेळा गुप्त बैठका झाल्या होत्या. या प्रक्रियेत खासदार सुप्रिया सुळे यांनाही विश्वासात घेण्यात आले होते.
बारामतीला सर्व नेत्यांची बैठक होणार होती. त्यासाठी विमान भाड्याने घेण्याचेही ठरले होते, मात्र बारामतीच्या धावपट्टीवर उतरू शकेल असे विमान न मिळाल्याने तो बेत पुढे ढकलावा लागला.
नियतीचा क्रूर घाला आणि 'ब्लॅक बॉक्स'चे रहस्य
जयंत पाटील यांनी अजितदादांच्या अपघाताबाबतही खळबळजनक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "विमान हवेत असताना मोठा आवाज येत होता, असे एका सरपंचांनी मला सांगितले. विमानामध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड होता, हे आता 'ब्लॅक बॉक्स'च्या माध्यमातूनच समोर येईल."
दादांच्या आठवणींना उजाळा देताना जयंत पाटील भावूक झाले. ते म्हणाले की, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर. आर. पाटील आणि माझ्यामध्ये कधीही पदासाठी स्पर्धा झाली नाही. अजितदादा एक उत्तम मुख्यमंत्री बनले असते, कारण निर्णयाची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता," अशा शब्दांत त्यांनी दादांच्या कार्यक्षमतेचा गौरव केला.
भुजबळ, तटकरे अन् पटेल: बड्या नेत्यांचे मौन की टाळाटाळ?
एकीकडे जयंत पाटील आणि खुद्द शरद पवार विलीनीकरणाच्या चर्चेला दुजोरा देत असताना, दुसरीकडे अजित पवार गटातील बडे नेते मात्र यावर बोलण्यास तयार नाहीत. छगन भुजबळ यांनी "अशी कोणतीही चर्चा माझ्या कानावर आली नाही," असे म्हणत हात झटकले आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही या विषयावर मौन बाळगले आहे. पार्थ पवार यांच्या खासदारकीबाबत विचारलेल्या प्रश्नावरही भुजबळांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.












Click it and Unblock the Notifications