आरोपींच्या अटकेनंतर मनोज जरांगे यांचा मोठा आरोप, सगळेच पुण्यातच सापडतात, कारण...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. या पूर्वी वाल्मिक कराडही पुण्यातच सापडला होता. या बातमीनंतर मराठा आंदोलनक मनोज जरांगे यांनी मोठा आरोप केला. सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात..? सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांच्या या आरोपींना पाठबळ आहे, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला.

काय म्हणाले जरांगे पाटील?
अटकेच्या बातमीनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरोपींना पुण्यातूनच अटक झाली. आता सरकारने या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. या आरोपींवर खंडणीचा आणि हत्येचा आरोप आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची नार्को टेस्ट करा. अजिबात हयगय करु नका. या सगळ्या प्रकरणात मोठं रॅकेट आहे. नार्को टेस्ट झाली तर, आरोपींच्या आकडा थेट ५०-६० पर्यंत जाईल" असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
आरोपींना कुणाचं पाठबळ?
जरांगे पाटील म्हणाले, "पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातंय. याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याचं आरोपींना प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना जो कोणी संभाळतोय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी. संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात काहींना मोठेपणा वाटतोय. सांभाळणारे नेमके कोण आहेत..? आरोपीला भाकरी घालणारे कोण आहेत..? त्यांना ऐशोआराम देणारे कोण आहेत..? हे सगळं सरकारने आता शोधून काढावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
पुण्याचं नाव खराब होतंय
यापूर्वी वाल्मिक कराड हा मुख्य संशयितही पुण्यातच सापडला. आता घुले व सांगळे हे दोन आरोपीही पुण्यातच अटक झाले. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सगळे पुण्यातच कसे सापडतात..? हा डावच आहे. सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतात. हे इतके दिवस लपून राहतात म्हणजे सामूहिक कट शिजतोय. सरकारमधील मंत्री-आमदार यांना शिकवतात. बीडचे नाव बदनाम केलं, आता पुण्याच नाव खराब करत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.
लपून ठेवणारेही पकडा
जरांगे पाटील म्हणाले, सगळे आरोपी लपवून ठेवण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे. हे मोठं रॅकेट आहे. नार्को टेस्ट केली तर ५०-६० आरोपी सापडतील. हे मॅटर थंड होणार नाही. कुणी कितीही मॅटर दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या बापालाही मॅटर दाबता येणार नाही. माझं गृहमंत्र्यालयाला एकच सांगणं आहे की, आरोपींना ज्यांनी लपवून ठेवलं होतं, त्यांनाही सोडू नका. ते सुद्धा खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते सुद्धा जबाबदार आहेत. या सगळ्यांना अटक करा, अशी मागणीही जरांगे यांनी केली.












Click it and Unblock the Notifications