गुलाबराव पाटलांची निराशाजनक कामगिरी, जळगावात शिवेसनेत खांदेपालट शक्य?
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, जळगाव जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर दुसरीकडे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी बलाढ्य विरोधकांचे आव्हान मोडीत काढत निर्भेळ यश संपादन केले आहे.

धरणगावात गुलाबराव पाटलांची तटबंदी ढासळली
शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, त्यांच्या या होमपीचवरच त्यांना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. लीलाबाई चौधरी यांनी २४१७ मते मिळवून महायुती प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवार वैशाली भावे यांचा पराभव केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान नसताना विरोधकांनी त्यांना घाम फोडला होता. आता नगरपालिका निवडणुकीत झालेल्या या पराभवामुळे गुलाबराव पाटील यांची स्थानिक पकड सैल होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पाचोरा-भडगावात किशोर पाटलांचा 'वन मॅन शो'
एकीकडे पालकमंत्र्यांना धक्का बसला असताना, दुसरीकडे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत किशोर पाटील यांच्यासमोर भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह विरोधकांची मोठी फौज उभी होती. माजी आमदार दिलीप वाघ, किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी आणि विधानसभेत कडवे आव्हान देणारे अमोल शिंदे हे सर्वजण पाटील यांच्याविरोधात एकवटले होते.
मात्र, या सर्व तगड्या विरोधकांना धूळ चारत किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव अशा दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशाच प्रकारे त्रिशतकुपी लढतीत विजय मिळवला होता, ज्याची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
'स्वबळाचा' नारा आणि वाढलेली संघटनात्मक ऊर्जा
विशेष म्हणजे, भाजपविरोधात 'स्वबळाची' हाक देऊनही शिवसेना विजय मिळवू शकते, हा विश्वास किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला आहे. महायुतीत असतानाही आपल्या अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या शिवसैनिकांना या निकालामुळे मोठी ऊर्जा मिळाली आहे. विरोधकांना थेट अंगावर घेऊन विजयश्री खेचून आणण्याची किशोर पाटलांची ही शैली आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यात संघटनात्मक खांदेपालट होणार?
किशोर पाटील यांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे आणि त्यांचा राजकीय आलेख सातत्याने उंचावत आहे. याउलट, पालकमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात झालेला पराभव चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत मोठा बदल केला जाऊ शकतो का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विरोधकांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या किशोर पाटील यांच्यासारख्या नेत्यावर मोठी जबाबदारी दिल्यास जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
आगामी काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व घडामोडींची दखल घेऊन काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतीत राहून पक्षाचा 'स्ट्राईक रेट' वाढवायचा असेल, तर किशोर पाटलांसारख्या नेत्यांना अधिक बळ देणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications