पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितला नाक दाबून तोंड उघडण्याचा 'प्लॅन'
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत अँक्शन मोडमध्ये आला. सध्या भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा दहशतवाद नेमका कसा थांबवायचा? हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. याच विषयावर वन इंडिया मराठीच्या आरती कुलकर्णी यांनी निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत दहशतवाद कसा थांबवता येईल, याबाबत महाजन यांनी आपले सडेतोड विचार मांडले. शिवाय पाकिस्तानला जोपर्यंत चीन मदत करत राहील, तोपर्यंत दहशतवाद थांबणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाकला चीनची मदत
पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार, असा प्रश्न महाजन यांना विचारण्यात आला. त्यावर हेमंत महाजन म्हणाले की, पाकिस्तानच्या या कारवाया कधीच थांबवणार नाही. त्यांना काश्मीर घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कशीही असो, पण पाकिस्तान दहशतवाद कधीच थांबवणार नाही. त्यांना चीनचा सपोर्ट आहे. चीन पाकला आर्थिक मदत देत असल्याचे अनेकदा बोलले जाते. त्यामुळेच पाकिस्तान भारताविरोधात कायम गरळ ओकतो, असं स्पष्ट मत महाजन यांनी व्यक्त केलं.
हल्ल्याला भारतातूनच मदत
महाजन म्हणाले की, या शिवाय भारतामध्ये राहुन पाकिस्तानला मदत करणारे अनेकजण आहेत. पहलगाम येथील हल्ल्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली. पहलगाममध्ये हल्ला करणारे चार अतिरेकी जेव्हा भारतात आले. तेव्हा त्यांना तेथील स्थानिकांनी मदत केल्याचं आता तपासात उघड होत आहे. कुणी त्यांना जेवायला दिलं, कुणी त्यांना रस्ता दाखवला, कुणी त्यांना गाईड केलं... हे सगळं भारतात घडलं. म्हणजेच जोपर्यंत भारतात राहून पाकिस्तानला मदत करणारे आपण शोधत नाहीत, तोपर्यंत हे असंच चालत राहणार असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.
रमत-गमत मुकाबला होणार नाही
भारतात राहुन पाकिस्तानला मदत करणारे जोपर्यंत आपण शोधून काढत नाही, तोपर्यंत हे दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत, असं महाजन यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले, आजही अनेकांना भारताची पाकिस्तानशी मैत्री व्हावी, असं वाटते. परंतु जोपर्यंत हे सरकार आहे, तोपर्यंत हे शक्य नाही. आजही पाकिस्तानमधील अनेक वृत्तपत्रे भारतीय नेत्यांनी मुस्लिमविरोधी धोरणांना केलेला विरोध ठळकपणे छापतात. त्यामुळे भारतात मुस्लिमांबाबत अन्याय होतोय, ही भावना तेथे वाढीस लागते. त्यामुळे भारतीय नेत्यांनी दहशतवादाला खतपाणी मिळेल, असं वक्तव्य करु नये, अशी अपेक्षाही महाजन यांनी व्यक्त केली.
चूक नेमकी काय झाली?
पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था नव्हती का, याबाबत प्रश्न विचारल्यावर महाजन म्हणाले की, काश्मिरची लोकसंख्या दोन कोटी आहे. तेथे गेल्या वर्षभरात अडीच कोटी पर्यंटक येऊन गेले. सुरक्षा व्यवस्था काश्मीर खोऱ्यात आहे. परंतु जेथे घटना घडली, तेथे काश्मीर पोलिस नव्हते. लष्करही नव्हते. ही चूक आहेच. पर्यंटक येतात, तेव्हा सुरक्षा व्यवस्था जास्त चोख असायला हवी. घटना घडल्यावर किमान १५ मिनिटांत लष्कर किंवा पोलिस पोहोचायला हवे होते, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसांत अमरनाथ यात्रा सुरु होईल, तेव्हा थ्री टिअर सुरक्षा असेल. परंतु ३६५ दिवस अशी सुरक्षा ठेवता येत नाही, हेही मान्य केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
भारताने काय पावले उचलावीत?
भारतात १९७५ पासून दहशतवाद सुरु आहे. परंतु आता पहलगाम घटना घडल्यावर भारताने कडक पावले उचलली आहेत. पाकिस्तान आता पाण्याची टंचाई येईल. पाकिस्तानच्या अन्नसुरक्षेला नक्कीच धक्का लागणार आहे. पाकिस्तानच्या व्यापारावरही परिणाम करण्याची भारताची तयारी आहे. पाकिस्तानच्या मुलभूत गरजा भागवणंही भारत कठीण करेल, असं महाजन यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications