Mumbai Airport Accident : इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीला आदळला; कसा घडला थरार!
IndiGo Plane Tail Strike at Mumbai Airport Latest News : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी इंडिगोच्या A321 विमानाला सुदैवाने अपघात होता होता टळला.
खराब हवामानामुळे विमानाचे लँडिंग करताना पुन्हा टेकऑफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी, विमानाच्या शेपटीचा भाग (tail) धावपट्टीला आदळला. या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती इंडिगो एअरलाइनने दिली आहे.
नेमकी घटना काय?
इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आज इंडिगोच्या A321 विमानाने कमी उंचीवर एक फेरी मारली. या प्रक्रियेत विमानाच्या शेपटीचा भाग धावपट्टीला स्पर्श झाला.
दुसऱ्या प्रयत्नात मात्र विमान सुरक्षितपणे उतरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.' एअरलाइनने पुढे सांगितले की, घटनेनंतर विमानाच्या तपासणीचे काम सुरू असून, आवश्यक दुरुस्ती व नियामक मान्यता मिळाल्यानंतरच विमान पुन्हा सेवेत आणले जाईल.

पावसाळ्यात वाढल्या अपघाताच्या घटना!
मुंबई विमानतळावर पावसाळ्यात विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी घडलेल्या दोन मोठ्या घटनांनीही प्रवाशांमध्ये चिंता निर्माण केली होती. यापूर्वी झालेल्या दोन अपघाताच्या घटनांखालील प्रमाणे आहेत.
21 जुलै 2025 : एअर इंडियाच्या विमानाचा अपघात!
एअर इंडियाचे AI2744 विमान मुंबई विमानतळावर लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे धावपट्टी निसरडी झाल्याने विमान सुमारे १६ ते १७ मीटर गवताच्या भागात गेले. या अपघातात विमानाचे तीन टायर फुटले आणि उजव्या इंजिनच्या नॅसेलचे (झाकण) नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यामुळे मुख्य धावपट्टी ०९/२७ तात्पुरती बंद करण्यात आली होती.

14 सप्टेंबर 2023 : विमानाचे झाले होते दोन तुकडे!
याआधीही विशाखापट्टणमहून आलेले 'लिअरजेट ४५ व्हीटी-डीबीएल' हे बिझनेस जेट मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टीवरून घसरले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आणि दोन वैमानिकांसह आठ जण जखमी झाले.
हे विमान काढण्यासाठी अनेक तास लागले, ज्यामुळे विमानतळावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या वाढत्या घटनांमुळे पावसाळ्यात विमानतळाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, २७० हून लोकांचा मृत्यू
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे देशभरात शोककळा पसरली. लंडनला निघालेले हे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांतच विमानतळाजवळ असलेल्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले.
मृत्यूची एकूण संख्या आणि इतर तपशील
या अपघातामध्ये एकूण 275 लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. यामध्ये विमानात असलेले 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा (230 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स) आणि जमिनीवरील 33 लोकांचा समावेश आहे.
जमिनीवरील मृतांमध्ये मेडिकल कॉलेजमधील काही विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी आणि इतर रहिवाशांचा समावेश होता. या अपघातात विमानातून प्रवास करणारा एकच व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बचावला.












Click it and Unblock the Notifications