एकनाथ शिंदे यांचे हिंदूत्व; हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारधारेचे खरे वारसदार !
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची उभारणी केली. त्यांच्या विचारधारेने भारलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले. आणि महाराष्ट्राचे राजकीय चित्र बघता बघता बदलून गेले. काँग्रेससारख्या सरंजामदारांच्या पक्षात कधीही संधी न मिळू शकणारे विस्थापित शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी झाले. हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरला.
मतांसाठी लांगुल चालनाचा विरोध, कलम 370 हटवणे, राम मंदिराची उभारणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती. आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली. देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपलं म्हणायचे, पण देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चीड होती. काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अनुद्गार काढले होते तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली. कपाळावर नेहमी टिळा लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात.

राम मंदिराचा कट्टर पुरस्कार
2019 साली सत्ते करिता उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली. बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेवर शिवसेनेचा डोलारा उभा होता ती विचारधाराच उद्धव यांना बाजूला ठेवावी लागली. आणि त्यामुळेच अनेक तडजोडी करणे उद्धव यांना भाग पडले. राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्षे न्यायालयात खितपत पडला होता. मोदी सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयातून सोडवून घेतला आणि राम मंदिराची उभारणी केली. पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही नव्या राम मंदिराचे स्वागत केले नाही. तर मंदिर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांची हेटाळणी केली. एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या राम मंदिराचे कौतुक करतात. हिंदू धर्मीयांचा पाचशे वर्षांचा लढा सफल झाला, अशी भूमिका एकनाथ शिंदे मांडतात. उद्धव ठाकरे यांना मात्र एकदाही अशी भूमिका घेता आलेली नाही.
सावरकरांचा सन्मान
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होळी करून टाकली. या कुटुंबाची संपूर्ण वाताहात झाली. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विचारधारेवर काँग्रेस नेहमीच टीका करत आली आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत असतात. राहुल गांधी त्यात आघाडीवर आहेत. राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतला आहे. पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेड पर्यंत गेले होते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने "मी सावरकर" अभियान राबवले आणि सावरकर सन्मान फेरी काढली.
बाळासाहेबांच्या विचारधारेचे वारसदार
कलम 370 हटवा अशी मागणी बाळासाहेब ठाकरे सातत्याने सार्वजनिक व्यासपीठावर करायचे. केंद्रातील मोदी सरकारने चातुर्याने कलम 370 हटवले आणि काश्मीर पूर्णपणे भारतात विलीन करून घेतले. त्याचे कौतुक करणे उद्धव ठाकरे यांना कधीही शक्य झाले नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी कलम 370 हटवणाऱ्या विचारधारेची युती करून आपणच बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहोत हे सिद्ध केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने काढलेल्या प्रचार फेरीत मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीचा सहभाग होता. ही बाब विशेष धक्कादायक आहे. महाराष्ट्रातून कोणताही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान महाराष्ट्रातील असावा असे अपेक्षित आहे. मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इमरान प्रतापगडी या उत्तर प्रदेश मधील कवीला महाराष्ट्रातून संधी दिली आणि त्याचा निषेध करायचे सौजन्यही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ताब्यातील शिवसेनेला दाखवता आले नाही.
रामगिरी महाराजांचे समर्थन
बाळासाहेबांच्या विचारधारेचे तंतोतंत पालन एकनाथ शिंदे यांच्याकडूनच केले जात आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. सावरकरांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाही, असा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून येथे बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आणि रामजन्मभूमीशी असलेला महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखी अधोरेखित केला आहे. हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द झाले पाहिजे हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी त्या भूमिकेचे पालन केले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक संमत केले जाणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रामगिरी महाराज यांच्या अटकेची अन्यायकारक मागणी अनेकांकडून केली जाते मात्र रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर जाऊन एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना द्यायचा तो संदेश देऊन टाकला आहे.
एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीही केलेला नाही. उलट सर्वांना चांगली वागणूक दिलेली आहे. पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे, हिंदूवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताच कामाने ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत.












Click it and Unblock the Notifications