महाराष्ट्र सरकार वर्गनिहाय CBSE अभ्यासक्रम कसा लागू करणार; वर्षनिहाय वर्गांची माहिती आली समोर
Education Minister Dada Bhuse on CBSE Syllabus Pattern : महाराष्ट्र सरकारने 2025-26 शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले आहे की, राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत CBSE अभ्यासक्रम लागू केला जाईल.
दादा भुसे म्हणाले की, सध्या, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दहावी (SSC किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र) आणि बारावी (HSC किंवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) साठी परीक्षा घेते.
पहिल्या टप्प्यात, इयत्ता पहिलीमध्ये CBSE पॅटर्न लागू केला जाईल. पुढील वर्षी, शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना CBSE अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा इतिहास, मराठी अनिवार्य असेल
राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी असेही सांगितले की, सीबीएसई पॅटर्न स्वीकारताना, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि मराठी भाषा अभ्यासक्रमाचा भाग असेल याची खात्री केली जाईल.
सुप्रिया सुळेंनी साधला सरकारवर निशाणा
सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्याबाबत चिंता व्यक्त करताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी भुसे यांना पत्र लिहून म्हटले आहे की, राज्य SSCऐवजी CBSC बोर्ड स्वीकारत आहे हे खूप वेदनादायक आहे. त्यांनी असाही दावा केला की सरकारचे हे पाऊल मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी हानिकारक आहे.
वर्गनिहाय कसा लागू होणार सीबीएससी अभ्यासक्रम
सोमवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिलेल्या निवेदनात भुसे म्हणाले की, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी लागू होईल आणि 2028 मध्ये बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी लागू होईल.
"2026 मध्ये, इयत्ता 2, 3, 4 आणि 6 वी समाविष्ट केली जाईल, तर 2027 मध्ये इयत्ता 5 वी, 7 वी, 9 वी आणि 11 वी समाविष्ट केली जाईल. 2028 मध्ये, 8 वी, 10 वी आणि 12 वी समाविष्ट केली जाईल," असे ते म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 : नवीन पाठ्यपुस्तके
भुसे म्हणाले की, नवीन अभ्यासक्रमानुसार पहिलीची पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याचे काम बालभारतीकडे सोपवण्यात आले आहे.
नवीन अभ्यासक्रम केवळ अंतिम परीक्षांवरच नव्हे तर सतत आणि व्यापक मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यास मदत होईल आणि दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्यास मदत होईल. सीबीएसई अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करण्यास मदत करेल," असे ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications