कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्याला दिला रेड अलर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. हवामान विभागाकडून देखील रोज पावसाबाबतचे अंदाज दिले जात आहेत. आज देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामध्ये 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलेला आहे.

त्यामध्ये कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याच्या इशारा दिलेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचप्रमाणे ठाणे,मुंबई,पालघर, रत्नागिरी, सातारा, पुणे,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.मराठवाड्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगली, सोलापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे कोकणातील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. दोन दिवसापूर्वी कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान च्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती. एकंदरीत कोकणात पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसलेला होता.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये देखील वाढ झाली आहे. कोकणातील सावित्री,आंबा, कुंडलिका, पाताळगंगा,उल्हास,गाढी, काळू, भातसा, वैतरणा, पिंजाळ, सूर्या या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.












Click it and Unblock the Notifications