हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाखाचे बक्षीस; 'या' संघटनेचे चॅलेंज; नेमका वाद काय?
Harshwardhan Sapkal controversy : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या वादाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले असून, सोलापूरच्या मराठा ठोक मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सपकाळ यांच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल, त्याला 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी खळबळजनक घोषणा मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे.

मराठा ठोक मोर्चाचा थेट इशारा
सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश डोंगरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर घणाघाती टीका केली. "सपकाळ यांच्यासारख्या नेत्यांमुळेच आज काँग्रेस रसातळाला गेली आहे. छत्रपती शिवरायांची तुलना इतर कोणाशीही करणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाहीत, तोपर्यंत मराठा समाज त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही," असा इशारा डोंगरे यांनी दिला. १ लाखाचे बक्षीस जाहीर केल्याने आता हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाद नेमका काय आहे?
मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून वाद सुरू झाला होता. या वादावर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते की, "टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला, अगदी तसेच काम टिपू सुलतानने केले." या वक्तव्यानंतर भाजप, शिवसेना आणि शिवप्रेमी संघटनांनी सपकाळ यांच्यावर टीकेची झोड उठवली. तुलनात्मक वक्तव्यामुळे हिंदू भावना दुखावल्याचा आरोप करत पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळ यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
सपकाळांचे प्रत्युत्तर; 'माझ्या वक्तव्याची मोडतोड केली
चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी 'X' वर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "माझ्या वक्तव्याची मोडतोड करून 'ध' चा 'मा' केला गेला आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा दावा सपकाळ यांनी केला. तसेच त्यांनी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर आली असून विरोधकांनी याला निवडणुकीच्या तोंडावर 'हिंदू कार्ड' म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सपकाळ यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.












Click it and Unblock the Notifications