शरद पवारांचा भाजपला धक्का, हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार, वाचा सविस्तर नेमकं काय म्हणाले?
इंदापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून विकासाची गाडी थांबली आहे. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी आज मोठा निर्णय घेतला. आम्ही जी भूमिका व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका आहे, त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहे, माझ्यासमवेत विविध पदाधिकारी देखील असणार आहेत, अशी घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली. ते इंदापूरात पत्रकारांशी बोलत होते.

आता मीच तुमचा सूत्र म्हणून माहिती देत आहे. प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीट मिळेल की नाही ते जयंत पाटील, सुप्रिया सुळे या ठरवतील. पवार कुटुंबांचे आमचे चांगले संबंध आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून माझं अन्य लोकांशी वाद आहे, असे होऊ शकत नाही, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या भेटीवर?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानसभेबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी सर्वांना बोलवलंय. काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासाठी निर्णय होत नाहीत.
फडणवीस भेटीवर म्हणाले?
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शरद पवारांची भेट घेण्याअगोदर मी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली. दीड दोन तास माझी सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जेवढा संघर्ष केला आहे त्या कार्यकर्त्यांसाठी मी हा निर्णय घेत असल्याचे मी त्यांना सांगितले. फडणवीसांनी माझ्यासमोर काही ऑफर देखील दिलेल्या होत्या. पण मला जनतेचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काय?
जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांच्या भावना जाणून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आपला निर्णय झाल्यावर ज्या पक्षातले नेते पुढची भूमिका जाहीर करतील. तो अधिकार आपला नाही. मला तिकीट मिळेल की नाही ते पक्षाचे नेते ठरवतील, असा विश्वास देखील हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
कुणावर टीका नको, सोशल मीडियावर काही लिहू नका
2014 च्या पराभवाची खदखद लोकांच्या मनात आहे. मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे. जनता सांगते त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही . आपल्याला विजय मिळवायचा आहे. या इंदापूर तालुक्याने 35 वर्ष मंत्रीपदही बघितलं आहे.












Click it and Unblock the Notifications