गुलाबराव पाटलांचा अजब दावा; म्हणाले, अजित पवारांना सोबत घेतलं नसतं ना, तर...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकत मुख्यमंत्री पदावर दावा केलाय. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी याच निकालावर आपली प्रतिक्रीया दिलीय. अजित पवार गटाबाबत त्यांनी केलेल्या नव्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

गुलाबराव पाटलांचा दावा काय?
निवडणुकीबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवारांना महायुतीने सोबत घेतलं, त्यावेळी आम्ही कुणीच विरोध केला नाही. कारण तेही हिंदूत्वाच्या मुद्यावर सोबत आले होते. मात्र ते सोबत नसते, तर आम्हाला किमान १२५ जागा लढायला मिळाल्या असत्या. तसे झाले असते तर आम्हीही किमान १०० जागा जिंकल्याच असत्या. नरेंद्र मोदींना केंद्रात पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वांनी मदत केलीच. त्यासाठी कुठलीही आडकाठी आणायची नव्हती त्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेतलं.
श्रीकांत शिंदेबाबत केले मोठं विधान
नव्या सरकारमध्ये शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, अशा चर्चा सुरु आहेत. त्याबाबत गुलाबराव पाटलांना विचारलं असता, ते म्हणाले, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्याबाबत नेमकी काय चर्चा सुरु आहे, त्याबाबत आम्हाला फारसं माहित नाही. तो निर्णयही आमच्या हातात नाही. महायुतीत बैठक होईल, त्यात हे निर्णय घेतले जातील. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी व अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे, असंही गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांना मिळाल्या होत्या 41 जागा
विधानसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचा 230 जागांवर विजय झाला. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 57 जागांवर विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. महायुतीत सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जावून शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाबाबतही चित्र स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications