"रायगडावर धनगर समाजाची घरे पाहून त्रास होतोय का?" गोपीचंद पडळकर कुणावर संतापले?
राजकारणात हल्ली नेत्यांची विधानं जितकी आक्रमक होत आहेत, तितकीच टीकाही धारदार होताना दिसतेय. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट आणि आक्रमक टीका केली आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत पडळकर यांनी जयंत पाटलांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांची तुलना "विझणाऱ्या दिव्या"शी केली.
"जयंत पाटील यांचं राजकारण संपत आलंय"
गोपीचंद पडळकर म्हणाले, "जयंत पाटील यांचं राजकारण आता अस्ताला जात आहे. दिवा विझण्याआधी मोठा दिसतो, तशीच आज त्यांची अवस्था झाली आहे. सतत राजकीय चर्चांमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत काही दम नाही." त्यांनी यावरून जयंत पाटील यांना "संघर्ष न केलेला आणि अनुकंपा तत्त्वावर पुढे आलेला नेता" अशी उपमा दिली.
"पंक्चर काढणं वेगळं आणि टायर फुटणं वेगळं"
पडळकरांनी त्यांच्या शैलीप्रमाणे उपमा देत म्हटलं, "सायकलचं पंक्चर काढता येतं, पण टायर फुटल्यावर तो बदलावाच लागतो. जयंत पाटलांचीही तीच अवस्था झाली आहे. त्यांनी सांगलीसाठी एकही मोठा प्रकल्प आणलेला नाही. ते व्हीआयपी मंत्रिमंडळात वर्षानुवर्षे राहिले, पण ठोस कामगिरी कुठेच दिसली नाही."
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीला अवास्तव ठरवले
जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. यावर पडळकर म्हणाले, "मला त्यांचा राजीनाम्याचा विषय सिरीयस वाटत नाही. जबाबदारीपासून पळ का काढत आहेत, हे त्यांनाच ठाऊक."
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. शरद पवारांनी निवडणूकांनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केलं आहे.
"रायगडावर धनगर समाजाची घरे पाहून त्रास होतोय?" - पडळकरांचा संताप
या सभेत गोपीचंद पडळकर यांनी रायगड किल्ल्यावर धनगर समाजाच्या घरांवरून उफाळलेल्या वादावरही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, "स्वराज्य स्थापनेत धनगर समाजाचा मोलाचा वाटा होता. आज त्यांच्यावरच अन्याय का? रायगडावर पक्की घरे बांधण्यासाठी समाज मागणी करतो आहे, ती योग्य आहे. नोटीसा पाठवून त्यांना हटवण्याचा प्रयत्न पुरातत्व विभाग करत असेल, तर आम्ही ती नोटीस फाडून टाकू."
ते पुढे म्हणाले की, "या संपूर्ण प्रकरणाची माहिती मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. दोन-तीन दिवसांत आम्ही रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू."
शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही पडळकरांचे मत
या सभेत त्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणाचा संदर्भ देत मत व्यक्त केलं. "बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी आहेत, त्यांचं आंदोलन योग्यच आहे. मात्र, त्यांना सरकारच्या कामावर विश्वास ठेवायला हवा. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे संघर्षाऐवजी संवादातून मार्ग काढायला हवा," असा सल्लाही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications