'ती' व्हरांड्यात गाढ झोपली होती अन् तो आला, उडी मारून तिचा जीव घेतला, गोंदिया जिल्हा हादरला!
Tiger Attack on Old woman : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता देवरी तालुक्यातील धमदिटोला गावात वाघाने एका महिलेला ठार केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
व्हरांड्यात झोपलेल्या महिलेला ओढून नेले
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाबाई कोराम (वय ४९) या महिला आपल्या मुलीच्या घरी धमदिटोला येथे गेल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री त्या घराच्या व्हरांड्यात गाढ झोपलेल्या असताना, एका वाघाने त्यांच्यावर अचानक झेप घेतली. वाघाच्या या भीषण हल्ल्यात प्रभाबाई कोराम यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर वाघाने त्या मृतदेहाला ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत ओढून जंगलात नेले. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला असून, नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

(Photo Credit - AI Image)
चिमुकल्याचा जीव
गोंदिया जिल्ह्यात वन्यजीवांचा मानवी वस्तीतील वावर आणि हल्ले वाढले असल्याची चिंता या दोन घटनांमुळे वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर या ठिकाणी एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर, आणखी एका ठिकाणी, नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरजवळील कार्टरमध्ये राहणाऱ्या लष्करी जवानाचा दोन वर्षांचा मुलगा श्रुतिक गंगाधर यालाही बिबट्याने उचलून नेत ठार केले होते.
श्रुतिकच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी लष्करी जवान आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी थर्मल ड्रोन आणि श्वानपथकाचा वापर करून मोठी मोहीम राबवली होती. बिबट्याच्या एकामागोमाग एक झालेल्या या हल्ल्यांच्या घटनांचा विसर होत नाही, तोच वाघाच्या हल्ल्याची ही मोठी घटना घडल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वनविभागाविरोधात गावकऱ्यांचा संताप
रविवार, (दि.२८ सप्टेंबर) रोजी सकाळी ही घटना उघडकीस येताच धमदिटोला येथील गावकऱ्यांनी वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जंगलातून मानवी वस्तीत येणाऱ्या वन्यप्राण्यांना रोखण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
मृतक महिलेच्या कुटुंबीयांना त्वरित आणि पुरेशी आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून मृतक महिलेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच, उर्वरित पूर्ण आर्थिक मदत पुढील आठवड्याभरात करण्याचे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले आहे.
वन्यजीव हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण आणि जंगल परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.












Click it and Unblock the Notifications