राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, मनोज जरांगे आक्रमक
ओबीसी आंदोलनकर्ते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन राज्य शासनाकडून घेतल्यानंतरच वडिगोद्री येथील आपलं उपोषण स्थगित केलं आहे.काल (ता. २२) जून रोजी सरकारच्या शिष्टमंडळाला हाके आणि वाघमारे यांची समजूत काढण्यास यश मिळालं.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवूनच देणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज ( ता. 23 जून) पत्रकार परिषद घेऊन मोठी मागणी केली. राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, असं जरांगे म्हणाले आहेत.
जर मराठा शासकीय नोंदीवर कुणबी म्हणून असेल तर मराठी आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे आम्ही द्यायला तयार आहोत.नाहीतर सरकारने तरी सांगावे की मराठा आणि कुणबी एक नाहीत.. त्याचे पुरावे आम्ही सरकारला द्यायला तयार आहोत.
सरकारने ८३ क्रमांकाला मराठा नावाने १८० जातींमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे मराठी आणि कुणबी एकच आहेत. सरकार आरक्षण देत नसेल तर १८० नंतर ज्या जाती लावल्या त्या सर्व जाती काढा . असे १९९४ ला दिलेले आरक्षण रद्द करा,त्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
"माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर आम्हीदेखील तुम्हाला आमचे व्यवसाय दाखवतो. ते बागायती शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. आम्ही देखील शेतकरी मराठा म्हणून आमचा व्यवसाय दाखवतो. आम्हाला उत्तरं द्या. असं गोड बोलू नका. तुम्ही त्यांचे खूप लाड पुरवले. आमचा त्यांना विरोध नाही. तुम्हाला सर्वकाही संविधानानं हवं आहे ना, मग आम्हाला उत्तरं द्या तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण कसे दिले," असा प्रश्न मनोज जरांगे यांनी केला आहे.
मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे
सरकारी नोंदी मुस्लीम समाजाच्याही निघाल्या आहेत.जर मुस्लीमांच्या कुणबी नोंदी निघाल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. सरकार दरबारी हे कुणबी शेतकरी असल्याच्या नोंदी निघाल्या असतील तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं. त्यांच्यावरही अन्याय व्हायला नको.
आता कायद्यानेच बोला. मुस्लीम समाजाचे पाशा पटेल आहेत. त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली आहे. मु्स्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे," अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच हे आरक्षण कसं मिळत नाही, तेच मी बघतो, असं थेट आव्हानही मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.












Click it and Unblock the Notifications