मोठी बातमी! राज्यात गणेश विसर्जनावेळी 10 गणेशभक्त बुडाले! पुणे, नांदेड-नाशिक, वाशीममध्ये दुर्घटना
Ganesh visarjan 2025 : राज्यात गणेश विसर्जनावेळी 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, ही आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी असून जवळपास 10 जण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले आहेत. पु्ण्यात चौघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर नांदेड आणि नाशिकमध्ये दुर्घटना घडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात 4 गणेशभक्त बुडाले
नाशिक शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी उतरलेले जार गणेशभक्त पाण्यात बुडाले आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. शहरातील आनंदवली, नाशिक तालुक्यातील गोवर्धन गावाजवळ, कळवण मधील दसराने आणि सिन्नर तालुक्यात एक अशा चार ठिकाणी दुर्घटना घडल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले.

आनंदवल्ली गावाजवळ लहान पुलावरून काल सायंकाळी प्रवीण शांताराम चव्हाण हा युवक बुडाला. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही तसेच गोवर्धन गावाजवळ गणेशमूर्तीचे विसर्जन करताना विष्णू डगळे हा युवक नदीपात्रात वाहून गेला आहे. तसेच कळवण तालुक्यातील मौजे देसराने येथे पुनद नदीमध्ये गणेशभक्त दिनेश बाबुराव राजभोज पाय घसरून पडले. त्यांचा मृतदेह शोधण्यास सकाळी यश आले. सिन्नर तालुक्यातील सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिलहारे हे डोहात मूर्ती विसर्जनासाठी गेले असताना बुडाले आहेत.
नांदेडमध्ये श्री गणेश विसर्जनादरम्यान 2 तरुण बुडाले
नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच नांदेडजवळील गाडेगाव येथे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आसना नदीत दोन तरुण बुडाले.
या दुर्घटनेत आसना नदीत एकूण तिघेजण बुडाले होते. त्यातील एका तरुणाला शोधण्यात आले तर योगेश गोविंदराव उबाळे (वय १७ वर्ष) आणि बालाजी कैलास उबाळे (वय १८ वर्ष रा. गाडेगाव) हे दोघेजण मात्र अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांचाही शोध 'एसडीआरएफ'च्या पथकाकडून घेतला जात आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
वाशीम जिल्ह्यात अरुणावती नदीमध्ये तरुण वाहून गेला
वाशीम जिल्ह्यातील तील सेवादासनगर ता. मानोरा येथील युवक मृत्युंजय राजेश राठोड ( वय २३ ) हा दि ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गणपती विसर्जन करण्यासाठी अरूणावती नदी तीरावर गेला असता नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली.
सविस्तर असे की, रविवारी गणेश विसर्जनाची तयारी सुरू असताना मानोरा तालुक्यातील सेवादासनगर येथील गणेश मंडळ विसर्जनासाठी भक्तिभावाने गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी अरूणावती पात्रात पोहोचले असता गावातील अविवाहित युवक मृत्युंजय राठोड हा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली.
स्थानिक नागरिकांनी महसूल व पोलीस विभागाला कळवून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या युवकांचा शोध घेतला असता मिळून आला नाही.
पुणे जिल्ह्यात चौघे बुडाले, दोघांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार युवक पाण्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात दोन युवकांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भामा नदी, प्रियदर्शन शाळेजवळ अभिषेक संजय भाकरे (वय २१) आणि आनंद जयस्वाल (वय २८) हे दोघे गणेश विसर्जनासाठी नदीत उतरले असताना बुडाले. आनंद जयस्वाल यांचा मृतदेह मिळाला असून, अभिषेकचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. रवींद्र वासुदेव चौधरी (वय ४५) हे विसर्जनादरम्यान नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत.












Click it and Unblock the Notifications