Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ganesh Chaturthi 2024: अष्टविनायक गणेश मंदिरांचा इतिहास, संस्कृती आणि महत्त्व, कुठे आहेत मंदिर? वाचा

Ganesh Chaturthi 2024, Ashtavinayak Ganesha Temples : अष्टविनायक म्हणजे समस्त महाराष्ट्रातील गणेशभक्तांचं श्रद्धास्थान. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची झाल्यास गणपतीपासुनच करतात, गणपतीला समस्त देवांमध्ये मानाचे स्थान पहिले नमन गणपतीलाच करतात. महाराष्ट्रातील गणेश उत्सव तर पुर्ण देशाच चर्चेचा विषय असतो. देशात गणपतीची मंदिरे आहेत तसे महाराष्ट्रात महत्वाची आठ मंदिरे आहेत.

महाराष्ट्रात गणपतीची आठ प्रमुख मंदिरांना अष्टविनायक असे म्हटले जाते आठ मंदिरांपैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि 2 रायगड जिल्ह्यात आहेत. आज गणेशोत्सव 2024 च्या निमित्ताने आपण अष्टविनायक मंदिरे आणि त्यांच्या इतिहासाविषयी जाणून घेणार आहोत.

Ganesh Chaturthi 2024 history culture and importance of Ashtavinayak Ganesha Temples maharashtra

1) मयुरेश्वर मोरगाव

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून पुणे जिल्ह्यातील, बारामती तालुक्यातील मोरगावचा मयुरेश्वर म्हणून ओळखला जातो. मयुरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधलेले आहे. असे म्हटले जाते की, मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

मयुरेश्वराचा इतिहास

असे म्हणतात की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे कारण महादेवाच्या मंदिरासमोरच नंदी पहायला मिळतो.

2) श्री. सिध्दीविनायक - सिध्दटेक

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथे भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. असे म्हणतात की, या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली असंही सांगितले जाते. मधु व कौटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली.

विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हंटले जाऊ लागले. येथील दक्षिणवाहिनी असणाऱ्या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला असून मंदिराचा जिर्णोध्दारदेखील केला.

3) बल्लाळेश्वर - पाली

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभाऱ्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणाऱ्या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभाऱ्याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चवऱ्या ढाळीत आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.

4) वरदविनायक - महाड

ऋषी गृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले.

या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा )या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1775 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले.

5) चिंतामणी - थेऊर

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभाऱ्यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली.

गणपतीचे मंदिर श्रीमोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्रीमोरया यांचे नातू श्रीधरणीधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

6) श्री. गिरीजात्मज - लेण्याद्री

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्माजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी 367 पायऱ्या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माजाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.

असं म्हणतात की, गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.

7)विघ्नेश्वर - ओझर

असं म्हणताता की, सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचा नाश करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केला. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे.थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. हे गणपतीचे एक जागृत स्थान आहे.

8)महागणपती - रांजणगाव

अष्टविनायक गणपती मधील हे शेवटचे आणि जुने मंदिर. हे क्षेत्र पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे आहे. हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेशमूर्तीची येथे स्थापना केली असे सांगितले जाते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते.Ashtavinayak Ganesha Temples

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+